

सिंधुदुर्ग : मंगळवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या सरीवर सरी कोसळल्या आणि अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर कोकणातील खराखुरा पावसाळा सुरू झाला आहे. मंगळवारी सकाळपासून फारशी उसंत न घेता पाऊस कोसळत आहे. हवामानशास्त्र विभागाने पुढील पाच दिवस असाच पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. या पाच दिवसांमध्ये ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाटही होईल असा अंदाज दिला आहे. मंगळवारी पडलेल्या पावसामुळे सुकलेल्या नद्यांमध्ये पाण्याचा प्रवाह वाहू लागला आहे.
६ जून रोजी तळकोकणात वर्दी दिलेल्या मान्सूनने नंतर मात्र आपला करिश्मा दाखविला नाही. किंबहुना तो पूर्णपणाने निष्क्रिय होता. संपूर्ण महाराष्ट्रातील त्याची वाटचाल थांबली होती; मात्र गेल्या रविवारी २१ तारखेला तळकोकणात पुन्हा आकाशामध्ये ढगांचे आच्छादन तयार झाले. रविवारी काहीसा शिडकावा करून सोमवारी तो अधिक सक्रिय झाला होता. सोमवारी रात्री जिल्हाभरात चांगला पाऊस पडला. मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत त्यापूर्वीच्या २४ तासांत तब्बल ८८ मि.मि. पावसाची नोंद झाली. मंगळवारी सकाळपासून पावसाच्या सरीवर सरी सुरू झाल्या होत्या.
नळ पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी पाण्याने भरू लागल्या आहेत. हवामानशास्त्र विभागाने बुधवारी सिंधुदुर्गातील सर्व भागांमध्ये पाऊस पडेल असे म्हटले आहे. गुरुवारी, शुक्रवारी मात्र हेवी रेन फॉलचा अंदाज व्यक्त केला आहे.
दिवसात ८० टक्के महाराष्ट्र व्यापला
मान्सूनने बघता बघता एका दिवसात ८० टक्के महाराष्ट्र कवेत घेतला. महाराष्ट्रात आल्यानंतर रेंगाळलेला मान्सून सोमवारपासून कमालीचा वेगवान झाला. सध्या त्याचा वेग प्रचंड असून अवघ्या २४ तासांत मंगळवारी त्याने राज्याचा ८० टक्के भाग व्यापला. मुंबईसह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राचा बराचसा भाग अधिपत्याखाली आला असून फक्त नंदूरबार आणि धुळे जिल्ह्यात तो जायचा बाकी आहे. त्यामुळे राज्यात आगामी पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या मते या आठवड्यातच धरणात मोठ्या पाण्याची आवक सुरू होण्याची शक्यता आहे.