पाऊस थांबल्याने पूर परिस्थिती निवळली pudhari photo
रायगड

Raigad Rain Update | पाऊस थांबल्याने पूर परिस्थिती निवळली

पुढारी वृत्तसेवा

रायगड : पावसाने हवामान विभागाच्या अंदाजाला आज हुलकावणी दिली आहे. शुक्रवारसाठी रायगड जिल्हयाला पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने जाहीर केला होता. मात्र शुक्रवारी तुरळक सरी सोडल्यास मोठा पाऊस जिल्हयात झाला नाही. पावसाचा जोर कमी झाल्याने जिल्हयातील नद्यांची पातळी कमी होऊन पूरस्थिती ओसरत आहे. त्यामुळे रोहा, महाड, पेण तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. जिल्ह्यात जनजीवन पूर्वपदावर येत आहे. तर प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे सुरु केले आहेत.

रायगड जिल्ह्यात गेली दोन दिवस अतिवृष्टी झाल्याने प्रमुख नद्यांना पूर आला होता. महाड, रोहा, कर्जत, पेण येथील नद्यांची पातळी वाढून नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. या तालुक्यांमध्ये महापूराची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनानेही तातडीने उपाययोजना सुरू केल्या होत्या. जिल्हाधिकारी किशन जावळे यानी महाड, पाली, नागोठणे येथील पूरपरिस्थितीची पाहणी केली. रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी ही सकाळी धोक्याच्या पातळीवरु वाहत होती. त्यामुळे रोहा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. तसेच रोहा-नागोठणे आणि रोहा- वरवटणे पूल वाहतुकीसाठी बंद ठेवला होता. पाली-वाकण पुलावरुन पाणी वाहत असल्याने येथील वाहतूक बंद करण्यात आली होती. कर्जतमध्ये देखील पावसाचा प्रकोप पहायला मिळाला. या ठिकाणीच्या दहीवली पुलावर पाणी आल्याने तोदेखील वाहतुकीसाठी बंद केला होता. शेलू बांधीवली नदीची पाणी पातळी वाढल्याने 1 हजार 275 नागरिकांचे स्थलांतर पॅराडाईज इमारतीच्या टेरेसवर केलेे, तसेच अन्य 35 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवले होते. अलिबाग-बोरघर येथील एक व्यक्ती वाहून गेला असून, त्यांचा मृतदेह सापडला आहे. माणगाव ताम्हिणी घाटात तसेच माणगाव येथे तीन ठिकाणी दरड कोसळली होती. प्रशासनाने ती तातडीने दूर केली आहे. अलिबाग, पेण, मुरुड, पनवेल, कर्जत, खालापूर, पाली, रोहा, तळा, माणगाव, महाड, पोलादपूर, म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यात अशंतः पूर्णतः पक्क्या आणि कच्च्या घरांचे नुकसान झालेले आहे. चार चारचाकी वाहनांसह नऊ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु केली आहे.

जिल्ह्यात पडणार्‍या पावसामुळे दिड हजारहून अधिक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले होते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसाचा जोर कमी झाल्याने नागरी वस्तीत घुसलेले पाणी कमी होऊन जनजीवन पूर्वपदावर येत आहे. तर शुक्रवारसाठीही पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता होती. जिल्हा प्रशासनाने सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली होती. मात्र शुक्रवारी पावसाने हवामान विभागाचा अंदाज सपशेल खोटा ठरविला. जिल्हयात काही तुरळक सरी सोडल्यास मोठा पाऊस झाला नाही.

कर्जतमध्ये 268 मि.मी. पाऊस

अलिबाग - 71 मी.मी. पेण - 83 मी.मी. मुरुड - 19 मी.मी, पनवेल - 117.60 मी.मी., उरण - 86 मी.मी., कर्जत - 268.20 मी.मी., खालापूर - 124 मी.मी, माणगाव - 48 मी.मी., रोहा - 71 मी.मी., सुधागड - 164 मी.मी., तळा -62 मी.मी., महाड - 102 मी.मी., पोलादपूर - 125 मी.मी., म्हसळा 80 मी.मी., श्रीवर्धन - 6 मी.मी., माथेरान - 201 मी.मी.

SCROLL FOR NEXT