Thane News | मुरबाडमध्ये दोघे वाहून गेले

Murbad flood : शोध सुरू; वृद्ध-अपंग मुलांसह 407 जण सुरक्षित स्थळी
drowned in murbad
नद्यांना पूर आल्याने आहेत तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेलाPexel

ठाणे : मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणार्‍या धरण क्षेत्रात बुधवारपासून पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केल्याने उल्हास नदी, काळू नदी, वालधुनी नदी उथडी भरून वाहू लागली आहे. धरणांमध्ये पाण्याचा अपेक्षित साठा झाल्याने पाणी कपात रद्द करण्यात आली आहे. दुसरीकडे या तिन्ही नद्यांना पूर आल्याने बदलापूर, कल्याण, बदलापूर आणि अंबरनाथमध्ये शेकडो घरांमध्ये पाणी शिरले असून पाच पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. मुरबाड तालुक्यातील काही तरुण पुराच्या पाण्यात मासेमारीसाठी बारवी धरण परिसरात गेले होते. त्यापैकी डोंगरन्हावे गावातील गणेश केणे हा तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेला असून मुरबाड शास्रीनगर-दुधाळेपाडा, येथील ज्ञानेश्वर गोंधळी हा देखील पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती मुरबाड पोलिसांनी दिली. या तरुणांचा शोध पोलिसांसह त्यांचे नातेवाईकांकडून घेतला जात आहे.

जिल्ह्यातील सर्वाना सुट्टी देण्यात आली असून शुक्रवारीही शाळांना महापालिकेने सुट्टी जाहीर केली आहे. पुराचे पाणी वाढू लागल्याने सुरक्षितेच्या कारणास्तव कल्याणमधील 40 कुटुंबातील 156 रहिवासी आणि अंबरनाथमधील सहवास वृद्धाश्रम आणि अपंग मुलांच्या सत्कर्म आश्रमातील 38 जण आणि 67 कुटुंबातील 200 जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. दुर्दैवाने मुरबाडमध्ये दोन तरुण वाहून गेले. बदलापूर आणि वांगणी दरम्यान पाणी वाढत असल्याने आज आणि उद्या डेक्कन एक्सप्रेस, प्रगती एक्सप्रेस आणि इंटरसिटी एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या असून आगामी 24 तास ही मुसळधार पाऊस पडणार असल्याने बदलापूरमध्ये एनडीआरएफची तुकडी तैनात करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात बुधवारपासून मुसळधार पाऊस पडत आहे. आज दिवसभर पावसाने थैमान घातल्याने धरणे भरू लागली आहेत. तानसा धरण भरल्याने प्रतिसेकंद 994 घमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे आता 99. 18 टक्के धरण भरले असून बारवी, भातसा, वैतरणा धरणेही भरू लागली आहेत. त्यामुळे मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील नागरिकांचा पाण्याच्या प्रश्न सुटला. तर दुसरीकडे संततधार पावसामुळे उल्हास नदी आणि काळू नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे अंबरनाथ, कल्याण, बदलापूर आणि भिवंडी तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले आणि तेथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कल्याण, अंबरनाथ आणि मुरबाड तालुल्यातील रायता, रूंदे, किशोर पूल, चिखला पूल, शिवढोली पूल, घोरला, म्हसा पूल, बदलापूर येथील पूल आणि पाली येथील पूल पाण्याखाली गेल्यामुळे रस्ते पूर्णपणे बंद झाले होते. त्यामुळे शेकडो गावांचा संपर्क तुटला होता. कल्याण-मुरबाड आणि मुरबाड- शहापूर हा रस्ता बंद झालेला आहे. उल्हास नदी आणि वालधुनी नदीला पूर आल्याने अंबरनाथ, बदलापूर कल्याण मुरबाड आणि भिवंडी तालुक्यातील घरांमध्ये पाणी शिरले. सुप्रसिद्ध अंबरनाथ येथील शिवमंदाराचा शिवलिंगचा गाभाराही पाण्याने भरला होता. रेल्वे उशिराने धावत होत्या.

ठाणे जिल्ह्यातील पावसाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

उल्हास नदी आणि काळू नदी धोक्याची पातळी भरून वाहत असल्याने अनेक पूल, रस्ते पाण्याखाली गेली. घरांमध्ये पाणी शिरले. या पार्श्वभूमीवर तातडीच्या आपत्कालीन उपाययोजना करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याशी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पालकमंत्री शंभूराजे देसाई दूरदृष्यप्रणालीद्वारे तर अपर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये-धुळे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, भिवंडी प्रांताधिकारी अमित सानप, तहसिलदार अभिजीत खोले, संजय भोसले हे प्रत्यक्ष उपस्थित होते.

धरणे सद्यस्थिती

  • तानसा 99 टक्के

  • भातसा 73 टक्के

  • बारवी 61 टक्के

  • मोडकसागर 98 टक्के

  • मध्य वैतरणा 64 टक्के

  • उल्हास नदी - धोक्याची पातळी ओलांडली

  • काळू नदी - धोक्याची पातळी ओलांडली

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news