Poladpur Deulkond wildfire
पोलादपूर : तालुक्यातील लोहारे ग्रामपंचायत हद्दीत सोमवारी दुपारी लागलेल्या वनव्यामुळे महावितरणच्या वीज यंत्रणेला मोठा फटका बसला. या आगीत केबलसह अन्य उपकरणांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या पोलादपूर तालुक्यात वनव्यांचे प्रमाण वाढले असून डोंगराळ भागात वारंवार आगी लागण्याच्या घटना घडत आहेत. याचा परिणाम अंबा बागायतदार तसेच लहान-मोठ्या व्यावसायिकांवर होत आहे. सोमवारी देऊळकोंड परिसरात लागलेल्या वनव्याने उग्र रूप धारण केले होते. या आगीच्या झळा थेट विद्युत खांबांपर्यंत पोहोचल्याने ते आगीच्या विळख्यात सापडल्याचे दिसून आले.
या घटनेमुळे खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित ट्रान्सफॉर्मर तात्काळ बंद करण्यात आला आणि सुमारे चार तास या भागातील वीजपुरवठा खंडित ठेवण्यात आला. नंतर पर्यायी ट्रान्सफॉर्मरद्वारे वीजपुरवठा सुरळीत करण्यात आल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.
दरम्यान, वनव्यामुळे महावितरणचे आर्थिक नुकसान होत असून वीजवाहिन्या, केबल आणि इतर यंत्रणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. परिणामी वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्राहकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वनवे रोखणे ही काळाची गरज असल्याचे मत महावितरणने व्यक्त केले आहे.
तालुक्यात वाढत्या वनव्यांच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. मात्र, ठोस कारवाईचा अभाव असल्याने स्थानिक नागरिक व निसर्गप्रेमींनी वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.