

रायगड : गेल्या दहा वर्षांपासून कोळसा भट्टीवर वेठबिगारी करणाऱ्या वाघमारे कुटुंबाची अखेर छळातून मुक्तता झाली असून, मालकाच्या ताब्यात असलेल्या त्यांच्या दोन मुलींची तीन वर्षांनंतर आई-वडिलांशी गळाभेट झाली आहे. 'सर्वहारा जन आंदोलन' संघटनेने केलेल्या कायदेशीर पाठपुराव्यामुळे हे यश आले असल्याची माहिती संघटनेच्या प्रमुख व जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी 'दैनिक पुढारी' ला दिली आहे.
नेमकी घटना काय?
मूळचे वरवटणे (ता. रोहा, जि. रायगड) येथील रहिवासी असलेले संतोष जानू वाघमारे आणि त्यांची पत्नी सुनीता वाघमारे यांना दहा वर्षांपूर्वी अनिल चव्हाण (रा. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) याने कामासाठी कर्नाटक राज्यातील रायपूर येथे नेले होते. तेथे हे कुटुंब सतत दहा वर्षे कोळसा पाडण्याचे काम करत होते. मात्र, या कामाचा योग्य मोबदला न देणे आणि मालकाच्या सततच्या त्रासाला कंटाळून वाघमारे दांपत्य ऑक्टोबर २०२५ मध्ये तेथून पळून नागोठणे येथे आले.
मुलींना ओलीस ठेवले
मालक अनिल चव्हाण याने संतोष आणि सुनीता पळून जाऊ नयेत म्हणून अनिता आणि पूजा या त्यांच्या दोन मुलींना गेल्या तीन वर्षांपासून आपल्या ताब्यात (ओलीस) ठेवले होते. त्यामुळे स्वतःची सुटका करून घेताना पोटच्या गोळ्यांना तिथेच सोडून येण्याची दुर्दैवी परिस्थिती पालकांवर ओढवली होती.
संघटनेचा हस्तक्षेप आणि कारवाईचा इशारा
हे प्रकरण 'सर्वहारा जन आंदोलन' संघटनेकडे आल्यानंतर संघटनेने तातडीने सूत्रे हलवली. हे प्रकरण कर्नाटकशी संबंधित असल्याने सुरुवातीला मालक अनिल चव्हाण याने मुली आपल्या ताब्यात असल्याचे नाकारले. मात्र, संघटनेने कायदेशीर कारवाईचा आणि पोलिसांत तक्रार करण्याचा कठोर इशारा दिल्यानंतर मालक नरमले. अखेर मुली आपल्याकडे असल्याचे त्याने मान्य केले.
तीन वर्षांनंतर सुटका
संघटनेच्या दणक्यानंतर अनिल चव्हाण याने रविवारी २२ मार्च २०२६ रोजी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे अनिता आणि पूजा या दोन्ही मुलींना त्यांचे आई-वडील संतोष आणि सुनीता वाघमारे यांच्या स्वाधीन केले. तब्बल तीन वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर आपल्या मुली सुखरूप परत मिळाल्याने वाघमारे कुटुंबाने सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
पुढील पाऊल
मालकाने दहा वर्षे राबवून घेऊनही मजुरीचा हिशोब दिलेला नाही. या कामाचा मोबदला मिळवून देण्यासाठी संघटना आता पुढील पाठपुरावा करणार आहे.