अलिबाग ः अलिबाग तालुक्यातील नागाव, आक्षी परिसरात मागील पाच दिवसांपासून एका बिबट्याचा वावर आढळून आलं आहे. या बिबट्याला पकडण्यात वनविभागाच्या यंत्रणेला अपयश आले आहे. त्यातच बिबट्याने आत्तापर्यंत 8 जणांवर हल्ला केला आहे. यामुळे परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे. त्यातच परिसरातील गावांमध्ये सातत्याने बिबट्या आला रे.... च्या अफवा पसरत असल्याने त्याचाच धसका नागरिकांसह पर्यटकांनीघेतला आहे.
नागाव मधील वाळंज पारोडा खालच्या आळीत भर वस्तीत बिबट्याचा वावर आढळून आला. दिवसभरात बिबट्याने सहा जणांवर हल्ला केला. यांनतर बुधवार व गुरुवारी बिबट्या कुणाच्याही दृष्टीस पडला नाही. यामुळे रेस्क्यू टीम परत गेल्या. मात्र शुक्रवारी (दि.12) नागाव लगत असलेल्या आक्षी गावातील साखर परिसरात बिबट्या आल्याचे उघड झाले आहे. शुक्रवारी पहाटे बिबट्याने साखर परिसरात दोन जणांवर हल्ला करीत त्यांना जखमी केले. यामुळे बिबट्याला पकडण्यासाठी अलिबाग वनविभाग व रोहा वनविभागाच्या रेस्क्यू टीमने आक्षी साखर येथे बिबट्याला पकडण्यासाठी सापळा रचित चार पिंजरे लावले. मात्र बिबट्या पिंजऱ्यात न गेल्याने बिबट्याला पकडण्याच्या वनविभागाच्या प्रयत्नांवर पाणी फेडले गेले.
नागाव व आक्षी साखर येथे बिबट्या दिसल्याने परिसरातील गावांमध्ये बिबट्या दिसल्याच्या अफवा पसरविणाऱ्या पोस्ट सोशल मीडियातून व्हायरल होतायत. चुकीचे फोटो आणि व्हिडिओ अपलोड केले जातायत. शुक्रवारी रात्री अलिबाग शहरातील डंपिंग ग्राउंड येथे बिबट्या दिसल्याचे व त्याने एका कुत्र्याला पकडला असल्याचा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला. या परिसरात वनविभागाने पाहणी केली. यांनतर सदर व्हिडिओ हा अलिबागचा नसल्याचे लक्षात आले. तसेच परिसरातील इतर गावांमध्येही बिबट्या पाहिल्याचा अफवा सातत्याने पसरत असल्याचे दिसून येते. यामुळे बिबट्या पेक्षा बिबट्या आला रे...च्या अफवांमुळे नागरिकांमध्ये जास्त दहशत निर्माण होत आहे.
पर्यटनावर परिणाम
नागाव,आक्षी परिसरात विकेन्डला मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात.पण बिबट्याच्या अफवेचा मोठा फटका पर्यटन व्यवसायावर झाल्याचे दिसून येत आहे.अनेकांनी यापूर्वी बुकींग केले होते.पण भीतीने अनेकांनी बुकींगच रद्द केल्याचे काही व्यावसायिकांनी सांगीतले आहे.