

देवराष्ट्रे : देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथे शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास एकाच ठिकाणी चार बिबट्यांचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, यातील दोन बिबटे तब्बल दोन तास झाडावर ठाण मांडून होते. तसेच बेल्जियम शेफर्ड जातीच्या दोन कुत्र्यांनी बिबट्यावर प्रतिहल्ला केल्याने अक्षरश: एकाचा जीव वाचला आहे. यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
शिरगाव-कुंभारगाव जुन्या रोडलगत देवराष्ट्रे हद्दीत भरत साळुंखे यांचे शेत व घर आहे. शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ते कारखान्याला गेलेल्या उसाच्या शेतातून जवळच असलेल्या बोरीच्या ओढ्याजवळ गेले होते. यावेळी अचानक बिबट्या मादी व दोन पिलांनी गुरगुरत साळुंखे यांच्या दिशेने धाव घेतली. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या बेल्जियम शेफर्ड कुत्र्यांनी प्रतिहल्ला केल्याने बिबट्या उसाच्या शेतात पसार झाल्याचे साळुंखे यांनी सांगितले. त्यानंतर साळुंखे यांनी गावात फोन करून मित्रांना बोलावले व ओढ्यानजीक पाहणी केली. यावेळी त्यांना झाडावर आणखी दोन बिबटे दिसून आले.
घटनेची माहिती कडेगाव प्रादेशिक वन विभाग व सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यातील अधिकाऱ्यांना देण्यात आली. अधिकारी व कर्मचारी घटनास्थळावर आले. बिबट्या मादी पिलांसाठी अचानक हल्ला करू शकते, त्यामुळे त्यांनी शेतकरी व ग्रामस्थांना बाजूला करून बिबट्यांवर लक्ष ठेवले. तब्बल दोन तासानी बिबट्यांनी झाडावरून उतरून उसाच्या शेतात पळ काढला. चारही बिबटे पूर्ण वाढ झालेले असून या परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवून या बिबट्यांवर लक्ष ठेवले जाणार असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले, तसेच शेतकऱ्यांनी शेतात जाताना सावध असावे व काळजी घ्यावी, असे आवाहन वन अधिकाऱ्यांनी केले आहे.
कुत्र्यांनी वाचवला जीव
भरत साळुंखे हे आपल्या शेतात तुटून गेलेल्या उसाची पाहणी करीत ओढ्यानजीक गेल्यानंतर अचानक उसाच्या शेतातून बिबट्या व दोन पिले साळुंखे यांच्या दिशेने गुरगुरत आली. यावेळी त्यांच्यासोबत असलेली दोन बेल्जियम शेफर्ड जातीची कुत्री बिबट्यावर धावून गेली. यामुळे बिबट्या व पिले परत मागे पळून गेली. साळुंखे यांच्यासोबत कुत्री होती, यामुळेच त्यांचा जीव वाचल्याचे बोलले जात आहे.