

नाशिक : शहरातील वर्दळीचा भाग असलेल्या विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाच्या परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार सीसीटीव्हीत कैद झाला. त्याला शोधण्यासाठी वन विभागाने परिसर पिंजून काढला. मात्र, बिबट्या आढळून न आल्याने नागरिकांत भीती आहे. दरम्यान, पोलिस व वन विभाग अधिकाऱ्यांची निवासस्थाने व कार्यालय आहे. भरवस्तीत येणारा बिबट्या थेट अधिकाऱ्यांच्याच दारात पोहोचल्याची चर्चा यानिमित्त रंगत आहे.
मागील काही दिवसांपासून शहरात बिबट्या दिसण्याच्या घटना समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी महात्मानगरच्या वनविहार कॉलनीत बिबट्या शिरला होता. तेथे अनेकांवर हल्ले केले होते. अथक प्रयत्नानंतर त्यास रेस्क्यू करण्यात आले. दुसऱ्याच दिवशी भोंसला स्कूलच्या आवारात बिबट्या असल्याची चर्चा होती. मात्र, तेथे नंतर रानमांजर आढळले. दरम्यान, या घटना ताज्या असताना शुक्रवारी (दि.१२) पहाटे साडेचारला गडकरी चौक परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार सीसीटीव्हीत कैद झाला.
या ठिकाणी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षकांचे कार्यालय आहे. रात्रपाळीस कार्यरत पोलिसांना आवारात बिबट्या दिसला. या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी सुमीत निर्मळ, वन्यप्राणी बचाव पथक, पोलिस आणि शहर पोलिसांचे श्वानपथक घटनास्थळी पोहोचले. परिसरात शोध मोहिम राबवण्यात आली. मात्र, बिबट्याचा ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे वनविभागाने परिसरात वावरताना दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.
थर्मल ड्रोन, श्वान पथकाची मदत
थर्मल ड्रोन, श्वान पथकाच्या मदतीने अधिकारी कर्मचाऱ्यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालय आणि शासकीय निवासस्थान परिसर पिंजून काढला. शेजारीच पोलिस उपायुक्तांचे कार्यालय आहे. तेथेही शोध मोहिम राबवली. आसपासची शासकीय कार्यालये, व्यापारी संकुले व बसस्थानक परिसरातही बिबट्याचा शोध घेतला. मात्र, ठावठिकाणा लागला नाही.
लहान मुलांची काळजी घ्या
सीसीटीव्हीत दिसणारा बिबट्या दिवसभराच्या शोधानंतरही आढळला नसल्याने चिंता वाढली आहे. दक्षता घेण्यचे आवाहन वनविभागाने केले आहे. लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी, असेही म्हटले आहे. वन्यप्राणी आढलल्यास वनविभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
असा आला असावा बिबट्या
नासर्डी नदी काठातून बिबट्याने आयजी ऑफिसपर्यंतचा प्रवास केला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. पिंपळगाव बहुला येथून नासर्डी नदीकाठाने त्याने पांडूरंग गायकवाड नगरपर्यंतचा प्रवास केला असावा. तेथून त्याने मुंबईनाका परिसरातून आयजी ऑफिस गाठले असावे. पहाटे वर्दळ नसल्याने त्याला आयजी ऑफिसपर्यंतचा प्रवास शक्य झाला.