Pen Taluka Flood Situation
कमलेश ठाकूर
पेण : पेण तालुक्यात सलग चौथ्या दिवशी मुसळधार पावसाने कहर केला असून रविवार रात्रीपासून सोमवार दिवसभर पावसाचे रौद्र रूप पाहायला मिळाले. संततधार पावसामुळे तालुक्यातील नद्या धोक्याच्या पातळीवर पोहोचल्या असून अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक घरांमध्ये चार ते सहा फूट पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
बाळगंगा, भोगावती, खरोशी, खारपाडा आणि पाबळ या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने त्यांच्या काठावरील आंतोरे, नवघर, तरणखोप, बारिवाडी, राधाकृष्णवाडी, खरोशी, दुरशेत, वरसई, उरणोली, सोनखार, जिते, रावे, दादर, तांबडशेत, कळवे आदी गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. अनेक घरांमध्ये चार ते सहा फूट पाणी साचल्याने संसारोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले. पुराच्या पाण्यामुळे या गावांना जोडणारे रस्तेही बंद करण्यात आले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
सततच्या पावसामुळे वरसई व खरोशी परिसरात काही घरांवर झाडे कोसळली. तसेच खरोशी, कावजीवाडी आणि साक्षी किल्ल्याच्या परिसरात दरडी कोसळण्याच्या घटनाही घडल्या. खरोशी गावात डोंगरालगत असलेल्या एका घरावर झाड कोसळल्यानंतर डोंगरावरील मोठा दगड घराच्या भिंतीवर आदळल्याने भिंतीला मोठे भगदाड पडले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मुसळधार पावसामुळे मुंगोशी-बेलवडे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला असून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी वेगाने वाहत असल्याने या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे.
हमरापूर, तांबडशेत, सोनखार, उरणोली, जिते, राधाकृष्णवाडी, आंतोरे, नवघर आदी गावांतील अनेक घरांमध्ये चार ते पाच फूट पाणी शिरल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. प्रशासनाने तत्काळ मदतकार्य सुरू करून पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी तसेच गावातील शाळांमध्ये हलविण्याची व्यवस्था केली.
पेण तालुक्यातील खारपाडा आणि दुरशेत येथील नदीपात्रावरील पुलांवर सोमवार पहाटेपासून पुराचे पाणी आल्याने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुमारे तासभर बंद ठेवण्यात आली होती. पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.
पेण शहरालगतच्या भोगावती नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने हिमगौरी हॉटेल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे हॉटेलमधील सुमारे ३० ते ३५ कर्मचारी त्यांच्या खोल्यांमध्ये अडकून पडले. पाण्याची पातळी वाढत गेल्याने काहींना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पत्र्याच्या पाइपचा आधार घ्यावा लागला.
घटनेची माहिती मिळताच पेण पोलीस, नगर परिषद, महसूल प्रशासन तसेच स्थानिक सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी तातडीने बचावकार्य हाती घेत सर्व कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका केली.
या बचावकार्यात तहसीलदार तानाजी शेजाळ, नायब तहसीलदार प्रसाद काळेकर, पोलीस अधिकारी घरत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख समीर म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते कल्पेश ठाकूर, माजी शहरप्रमुख रविंद्रनाथ पाटील, भूषण पाटील, दिनेश पाटील तसेच अन्य स्वयंसेवकांनी मोलाचे योगदान दिले.