Crop Damage File Photo
रायगड

Farmer Compensation Delay: नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना निधी वाटपात संथपणा

रायगड जिल्ह्यातील 66 हजार शेतकऱ्यांपैकी केवळ 20 हजार जणांनाच मिळाली थेट मदत

पुढारी वृत्तसेवा

रायगड: 2025-26 या आर्थिक वर्षात रायगड जिल्ह्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला असला, तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात पडणाऱ्या निधीची गती प्रचंड संथ असल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यातील एकूण 66 हजार 283 बाधित शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत केवळ 20 हजार 803 शेतकऱ्यांनाच प्रत्यक्ष निधीचा लाभ मिळाला असून, अद्याप 45 हजारांहून अधिक शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. संपूर्ण जिल्ह्यातील 24 हजार 349 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी एकूण 22 कोटी 33 लाख 30 हजार रुपये एवढा निधी देय आहे. प्रशासकीय स्तरावर सध्या केवळ 6 कोटी 39 लाख 37 हजार रुपयांचे वाटप पूर्ण झाले असल्याची माहिती कृषी विभागाच्या आढावा बैठकीत देण्यात आली आहे.

दक्षिण आणि मध्य रायगडची स्थिती; रोहा, महाडमध्ये निधी वाटप अत्यंत नगण्य

दक्षिण आणि मध्य रायगडमधील स्थिती अधिकच चिंताजनक आहे. माणगाव तालुक्यात 4,776 बाधित शेतकऱ्यांपैकी 664 जणांना 14.07 लाख रुपये तर तळा तालुक्यात 903 पैकी 658 शेतकऱ्यांना 15 लाख रुपयांचे वाटप झाले आहे.

रोहा तालुक्यात 5,880 शेतकऱ्यांपैकी फक्त 209 शेतकऱ्यांना अवघे 5 लाख रुपये मिळाले असून 273.73 लाख रुपयांचा निधी रखडला आहे. पाली तालुक्यात 2,902 बाधित शेतकऱ्यांपैकी 830 शेतकऱ्यांना 9.95 लाख रुपयांचे वाटप झाले आहे.

महाड तालुक्याची अवस्था अत्यंत बिकट असून, येथील 5,917 बाधित शेतकऱ्यांपैकी केवळ 36 शेतकऱ्यांना फक्त 58 हजार रुपये निधी मिळाला आहे. पोलादपूर तालुक्यात 1,691 शेतकऱ्यांपैकी 814 जणांना 20.9 लाख रुपये वितरित झाले आहेत. म्हसळा आणि श्रीवर्धन या किनारी तालुक्यांमध्ये निधी वाटपाची टक्केवारी काहीशी बरी असून, म्हसळामध्ये 1,351 पैकी 850 शेतकऱ्यांना 29 लाख रुपये, तर श्रीवर्धनमध्ये 1,033 पैकी 853 शेतकऱ्यांना 25.62 लाख रुपयांचा निधी अदा करण्यात आला आहे.

पावसाळा तोंडावर; तांत्रिक अडचणी आणि शेतकऱ्यांमध्ये संताप

मे महिना संपत आला तरी अद्याप 60 टक्क्यांहून अधिक शेतकरी मदतीपासून वंचित असल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आगामी पावसाळा तोंडावर आला असताना, पुढील हंगामाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांना पैशांची अत्यंत गरज आहे.

अनेक तालुक्यांमध्ये निधी बँकेत जमा न होण्यामागे आधार लिंकिंग, बँक खात्यांमधील तांत्रिक त्रुटी किंवा प्रशासकीय स्तरावरील मंजुरीची संथ प्रक्रिया कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.

मुरुड, महाड आणि रोहा सारख्या मोठ्या तालुक्यांमध्ये निधी वाटपाची टक्केवारी अत्यंत नगण्य असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शेतकरी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने या प्रक्रियेला गती देऊन उर्वरित 15 कोटी 93 लाख 93 हजार रुपयांचा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

उत्तर रायगडमधील बिकट अवस्था; अलिबाग, पेण आणि कर्जतमध्ये हजारो शेतकरी वंचित

तालुकावार स्थितीचा विचार केला असता, पेण तालुक्यात सर्वाधिक 14,984 बाधित शेतकरी असून, 449.28 लाख रुपयांच्या देय निधीपैकी फक्त 162.06 लाख रुपये 5,997 शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत. जिल्हा मुख्यालय असलेल्या अलिबाग तालुक्यात 8,947 शेतकरी बाधित असून 324.45 लाख रुपये देय आहेत, मात्र त्यापैकी केवळ 1,936 शेतकऱ्यांना 63.23 लाख रुपयांची मदत मिळाली आहे.

कर्जत तालुक्यात 3,593 हेक्टर क्षेत्र बाधित असून 9,722 शेतकऱ्यांना 394.57 लाख रुपये मिळणे अपेक्षित होते, त्यापैकी 5,446 शेतकऱ्यांना 220.5 लाख रुपयांचे वाटप झाले आहे.

मुरुड तालुक्यात तर प्रशासकीय अनास्था स्पष्ट दिसत असून, येथील 2,862 बाधित शेतकऱ्यांपैकी केवळ 10 शेतकऱ्यांना फक्त 70 हजार रुपयांचे वाटप झाले असून 122.92 लाख रुपयांचा निधी अजूनही प्रलंबित आहे. खालापूर तालुक्यात 1,955 बाधित शेतकऱ्यांपैकी 1,268 जणांना 36.61 लाख रुपये मिळाले आहेत. पनवेल तालुक्यात 1,911 शेतकऱ्यांपैकी 306 जणांना 9.47 लाख रुपये, तर उरणमध्ये 1,449 पैकी 926 शेतकऱ्यांना 26.68 लाख रुपयांचा निधी अदा करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT