Raigad minor kidnapping Pudhari
रायगड

Raigad minor kidnapping: रायगडात अल्पवयीन मुलांच्या अपहरणाच्या 41 घटना; पालकांमध्ये भीतीचे वातावरण

जानेवारी ते नोव्हेंबर 2025 दरम्यान धक्कादायक वाढ; कर्जत, पेणसह अनेक भागांत प्रकार

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग : रायगड जिल्ह्यात जानेवारी 2025 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत 18 वर्षांखालील मुलांच्या अपहरणाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून एकूण 41 अल्पवयीन मुलांच्या अपहरणाची नोंद झाली असून, ही बाब पालक, समाज आणि प्रशासनासाठी गंभीर चिंतेचा विषय ठरत आहे.

उपलब्ध आकडेवारीनुसार कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक 8 अपहरणाच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. त्यानंतर पेण (6), रसायनी (4), खोपोली (4), माणगाव (3), अलिबाग (3) आणि महाड एमआयडीसी (3) या भागांमध्येही अल्पवयीन मुलांच्या अपहरणाच्या घटना घडल्याचे स्पष्ट होते. नेरळ येथे 2 तर खालापूर, रेवदंडा, मुरूड, रोहा, पोयनाड, वडखळ, दादर सागरी आणि महाड शहर येथे प्रत्येकी 1 अपहरणाची नोंद आहे.

ग्रामीण तसेच शहरी भागात अशा घटनांचे प्रमाण वाढत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळा, क्रीडांगणे, बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणी मुलांची सुरक्षितता हा ऐरणीवर आलेला प्रश्न बनला आहे. काही प्रकरणांमध्ये अपहृत मुले सुखरूप सापडली असली तरी काही घटनांचा तपास अद्याप सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे.

या पार्श्वभूमीवर अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबविण्याची गरज व्यक्त केली जात आहे. शाळा व पालकांनी मुलांवर लक्ष ठेवणे, अनोळखी व्यक्तींबाबत सतर्कता बाळगणे, तसेच पोलिसांनी गस्त वाढवणे, सीसीटीव्ही यंत्रणा बळकट करणे व जनजागृती मोहिमा राबवणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT