जयंत धुळप
रायगड: आंध्र प्रदेशात कोळसा उद्योगात अमानुष सक्तीच्या मजुरीत अडकलेल्या रायगड जिल्ह्यातील ३९ कातकरी महिला, पुरुष आणि बालकांची रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या सत्वर पुढाकाराने प्रशासकीय मध्यस्थीने सुरक्षित सुटका करण्यात आली आहे.
रायगड जिल्हा प्रशासन, सर्वदीप विकास संस्था, अंकुर ट्रस्ट आणि इंटरनॅशनल जस्टिस मिशन यांच्या संयुक्त व प्रभावी समन्वयातून ही कार्यवाही पार पडली. सुटका करण्यात आलेल्यांमध्ये माणगाव तालुक्यातील कोशिंबळे, हरणे वाडी आणि खरवली परिसरातील पीडित आदिवासी कुटुंबांचा समावेश असल्याची माहिती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डाॅ.वैशाली पाटील यांनी दैनिक पुढारीशी बाेलताना दिली आहे.
लग्नसराई, सण-उत्सव आणि आजारपणासारख्या आणीबाणीच्या काळात महाराष्ट्रातच शेतीकामाच्या मोबदल्यातून परतफेड करण्याच्या आश्वासनावर या कातकरी कुटुंबांना आगाऊ रक्कम (ॲडव्हान्स) देण्यात आली होती. मात्र, त्यांना सांगण्यात आलेल्या कामाऐवजी थेट आंध्र प्रदेशातील गोरन्ट्ला येथील दुर्गम जंगल भागात कोळसा उद्योगात कामासाठी नेण्यात आले.
तेथे स्थानिक तेलुगू भाषा येत नसल्याने हे मजूर पूर्णपणे असहाय्य झाले होते. त्यांच्याकडून दीर्घकाळ काम करून घेतले जात होते, तसेच त्यांना मारहाण आणि भीती दाखवून अमानुष परिस्थितीत डांबून ठेवले होते. तेथे पुरेसे पिण्याचे पाणी, अन्न आणि निवाऱ्याचीही अत्यंत हालखीची व्यवस्था होती.
या नरकयातनांतून दोन कातकरी मजूर अत्यंत शिताफीने पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांनी स्थानिक स्वयंसेवी संस्था 'सर्वदीप विकास संस्थे'शी संपर्क साधून आपबिती सांगितली. त्यानंतर आयजेएम आणि 'अंकुर ट्रस्ट'च्या मदतीने ही बाब आंध्र प्रदेश व महाराष्ट्रातील संबंधित प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली.
इंटरनॅशनल जस्टिस मिशनने आंध्र प्रदेशातील संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ माहिती दिल्यानंतर, आंध्र प्रशासनाने सूत्रे हलवून धाड टाकली आणि ३९ बंधमजुरांची सुटका केली. सुटकेच्या वेळी काही महिलांकडे पुरेसे कपडेही नसल्याचे पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने तातडीने साड्यांची व्यवस्था केली.
त्यानंतर सर्व मजुरांना विशेष बसने महाराष्ट्राकडे रवाना करण्यात आले. शुक्रवारी मध्यरात्री हे ३९ कातकरी बांधव माणगाव परिसरात सुखरूप पोहोचले. माणगावचे तहसीलदार यांनी उपविभागीय अधिकारी संदीपन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या राहण्याची, भोजनाची आणि औषधोपचाराची तातडीने व्यवस्था केली.
दरम्यान, मुक्तीच्या या प्रवासात माणगाव परिसरात बस पोहोचत असतानाच सुनिता सेन जाधव या गरोदर कातकरी महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिने एका सुदृढ मुलाला जन्म दिला. या बाळाचे नाव 'आझाद' असे ठेवले, असल्याचे डाॅ.पाटील यांनी सांगीतले.
या प्रकरणातील आरोपी उद्योगमालकावर यापूर्वीही अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात कातकरी कुटुंबांना बंधमजुरीत अडकवल्याचे गंभीर आरोप झाले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
कोशिंबीळे वाडीवर दस्तऐवजीकरण व शिधाकिट वाटप सध्या कोशिंबीळे आदिवासी वाडीवर प्रशासकीय अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. आज सर्व कुटुंबांचे दस्तऐवजीकरण, नोंदणी व शासकीय दाखले देण्याची प्रक्रिया सुरू असून रायगड जिल्हाधिकारी स्वतः या पाड्याला भेट देऊन सुटका झालेल्या कुटुंबांशी संवाद साधणार आहेत.