रायगड

Raigad Road News : पालिकेची गाडीच खड्ड्यात रुतली! कामोठे सेक्टर २० मधील सेंट्रल बँक चौकातील रस्त्याच्या निकृष्ट कामाचा पर्दाफाश

अवघ्या तीन महिन्यांत डांबरीकरणाची दुर्दशा झाली आहे

पुढारी वृत्तसेवा

विकम बाबर

पनवेल : कोट्यवधी रुपये खर्च करून पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची डागडुजी आणि डांबरीकरण करण्यात आले असतानाच, अवघ्या तीन महिन्यांत या कामाचा दर्जा उघड झाला आहे. कामोठे शहरातील सेक्टर २० येथील सेंट्रल बँक चौकात पडलेल्या मोठ्या खड्ड्यात चक्क पनवेल महानगरपालिकेची सेव्हरेज वॅन रुतल्याची घटना सोमवारी घडली. या वॅनची पुढील दोन्ही चाके अक्षरशः बॉडीपर्यंत खड्ड्यात रुतल्याचे चित्र पाहायला मिळाले.

पावसाळ्यापूर्वी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र, पावसाळा सुरू होताच अनेक ठिकाणी पुन्हा खड्डे पडल्याने या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे कामोठे सेक्टर २० मधील सेंट्रल बँक चौकासह परिसरातील विविध चौकांमध्ये रस्ते खोदून अन्य कामे करण्यात आली. मात्र, ही कामे पूर्ण झाल्यानंतर खड्डे व्यवस्थित बुजविण्यात आले नसल्याने वाहनचालकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

सोमवारी (दि.31) याच रस्त्यावर पालिकेची सेव्हरेज वॅन आली असता ती मोठ्या खड्ड्यात अडकली. वाहनाची पुढील चाके खड्ड्यात खोलवर रुतल्याने वॅन बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे लागले. पालिकेच्या वाहनाचीच अशी अवस्था झाल्याने सामान्य वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

डांबरीकरणानंतर पुन्हा खड्डे

रस्त्याचे डांबरीकरण करून अवघे काही महिने उलटले असतानाच रस्त्यावर पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून डांबरीकरण उखडले असून, रस्त्यावर खडी पसरली आहे. त्यामुळे दुचाकीस्वार घसरण्याचा तसेच मोठ्या वाहनांमुळे अपघात होण्याचा धोका वाढला आहे.

अपूर्ण कामांचा फटका नागरिकांना

चौकाचौकात विविध कामांसाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. मात्र, पावसाळ्यात ही खोदकामे योग्य पद्धतीने बुजविण्यात न आल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी खड्डे स्पष्ट दिसत नसल्याने अपघाताचा धोका आणखी वाढला आहे.

करदात्यांच्या पैशांचा अपव्यय?

एकीकडे रस्त्यांच्या डागडुजी आणि डांबरीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना दुसरीकडे अवघ्या तीन महिन्यांत रस्त्यांची पुन्हा दुरवस्था होत असल्याने पालिकेच्या कामांचा दर्जा नेमका कोण तपासतो? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई होणार का आणि पुन्हा त्याच रस्त्यांसाठी निधी खर्च केला जाणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT