Raigad Independence Day Pudhari
रायगड

Raigad Independence Day: “परेड... राष्ट्रीय सॅल्यूट... सलामी शस्त्र...!” डॉ. योगिता कुटे यांच्या कडक आवाजातील ऑर्डरने पोलीस मुख्यालय दुमदुमले

डॉक्टरी सोडून खाकीत दाखवला महिला नेतृत्वाचा रुबाब

पुढारी वृत्तसेवा

जयंत धुळप

रायगड: "परेड.... राष्ट्रीय सॅल्यूट ...सलामी शस्त्र..." अशा अत्यंत खड्या आणि कडक आवाजातील परेडला दिलेली ऑर्डर आज रायगड जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावरील शासकीय ध्वजारोहण सोहळ्याच्या वेळी सर्व मान्यवर आणि उपस्थितांच्या कानावर पडली आणि सर्वांचे लक्ष परेड कमांडर प्रशिक्षणार्थी महिला पोलीस उपअधीक्षक डॉ. योगिता कुटे-गाडगे यांच्याकडे गेले आणि सर्वांचेच उर अभिमानाने भरून आले.

स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात पोलीस दलाच्या मुख्य परेडचे नेतृत्व एका तरुण महिला अधिकाऱ्याने अत्यंत शिस्तबद्धतेने आणि आत्मविश्वासाने पार पाडले. राष्ट्रध्वजाला दिलेली कडक सलामी आणि संचलनाचा रुबाब पाहून मैदानावर उपस्थित असलेल्या तरुणाईचा उत्साह द्विगुणित झाला.

वैद्यकीय पदवी ते खाकी वर्दीचा प्रवास

डॉ. योगिता कुटे-गाडगे यांचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आणि जिद्दीचा आहे. 'बीएएमएस' पदवी संपादन करून डॉक्टर झाल्यानंतर त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचा मार्ग उपलब्ध असतानाही, जाणीवपूर्वक आणि निश्चित ध्येय ठेवून पोलीस दलात दाखल होण्याचा निर्णय घेतला.त्या मूळच्या मुंबईच्या असून त्यांचे सासर अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर येथे आहे.

मुंबईत एका खाजगी कंपनीत नोकरी करणाऱ्या वडिलांच्या आणि गृहिणी असलेल्या आईच्या अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येत त्यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांचे पती ज्ञानेश्वर गाडगे मुंबईत वैद्यकीय सेवेत कार्यरत आहेत, तर बंधू आयटी क्षेत्रात आहेत.

तरुणाईसाठी अन् महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्रोतआजच्या या शासकीय सोहळ्यात डॉ. योगिता यांचे हे शिस्तबद्ध नेतृत्व केवळ सोहळ्याची शोभा वाढवणारे नव्हते, तर मैदानातील शेकडो मुलींसाठी आणि तरुणाईसाठी एक सशक्त उदाहरण ठरले. जिद्द, कठोर परिश्रम आणि योग्य ध्येय असेल तर महिला कोणत्याही क्षेत्रात नेतृत्व करू शकतात, हा संदेश आजच्या या सोहळ्यातून रायगडकरांपर्यंत पोहोचला.

पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या विश्वासाने मिळाली संधी

या अभिमानास्पद क्षणानंतर दैनिक पुढारी शी बोलताना डॉ. योगिता म्हणाल्या, रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी माझ्यावर विश्वास दाखवत परेड कमांडर म्हणून नेतृत्व करण्याची ही मोठी संधी दिली. आज ध्वजारोहण सोहळ्यात परेडचे नेतृत्व करताना आणि राष्ट्रध्वजाला सलामी देताना मनात अत्यंत अभिमानाची भावना निर्माण झाली असे त्यांनी आवर्जून सांगीतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT