रेवदंडा ः समाजातील सामाजिक बहिष्काराची प्रथा मोडीत काढण्यासाठी सरकारने कायदे केलेत,सामाजिक संघटनाही विविध मार्गांनी समाजप्रबोधन करत असतानाही रायगडात अजूनही अनेक ठिकाणी सामाजिक बहिष्काराच्या घटना उघड होत आहेत.वळके,ता.मुरुड येथे तब्बल दहा वर्षेएका कुटुंबाला समाजाने वाळीत टाकले.इतके वाळीत टाकले की त्या व्यक्तीच्या वडिलांचे निधन झाले.त्यावेळीही ग्रामस्थांनी अंत्ययात्रेत सहभागी न होण्याचाफतवा काढल्याचा घृणास्पद प्रकारघडला.या साऱ्या मानसिक छळाला कंटाळून बहिष्कार टाकण्यात आलेल्या कुटुंबाने रेवदंडा पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली.
याबाबतची फिर्याद मधुकर नारायण भगत (वय 66, रा. वळके ) यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात दिली. मधुकर नारायण भगत यांच्या म्हणण्यानुसार, सन 2016 पासून 8 सप्टेंबर 2025 पर्यंत गावातील समाज मंदिर येथे आरोपींकडून त्यांच्या कुटुंबाला बेकायदेशीरपणे वाळीत टाकण्याचे प्रकार सुरू होते. यामधील शंकर कमळ्या सावंत, गोपीनाथ सहदेव म्हात्रे, सुधाकर धनंजय भगत, राजेंद्र गणपत भगत, कमळाकर तुकाराम पाटील, किसन धर्मा म्हात्रे, शरद महादेव म्हात्रे, अनंता कमळ्या धोत्रे, कमलाकर महादेव म्हात्रे, भारत लखमा सावंत, राजीबाई महादेव भगत, निर्मल जनार्दन भगत, कुसुम गजानन म्हात्रे, सुधीर गंगाजी सावंत, नारायण चांगु वाजंत्री, जनार्दन रामा भगत, लीलाधर लक्ष्मण काटकर, अनिल मधुकर धनावडे, नथुराम सुदाम धनावडे, आत्माराम वामन म्हात्रे, सुभाष हाशा सावंत, अमोल मनोहर भगत, शंकर पद्माकर भगत, जनार्दन नागू म्हात्रे, राजेंद्र धर्मा पाटील, हरिश्चंद्र रामा म्हात्रे, किसन धर्मा म्हात्रे, महादेव नागू भगत, हरिचंद्र झिटू म्हात्रे, अरुण मधुकर धनावडे (सर्व राहणार मौजे वळके, ता. मुरुड, जि. रायगड) यांच्या विरोधात रितसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मधूकर भगत यांनी गावातील महिलांच्या संबंधीत अन्यायकारक निर्णय, गाव पंचांचे दंड, वर्गणी, फंड आणि बेकायदेशीर वसुली यास विरोध केल्याने आरोपींनी त्यांना व त्यांच्या कुटुंबाला गावातून वाळीत टाकले, सामाजिक बहिष्कार केला आणि दहा वर्षांची दंडाची मागणी केली, असा आरोप मधुकर नारायण भगत यांनी केला आहे. आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबाचे मानसिक खच्चीकरण करण्याच्या उद्देशाने, प्रत्येकी 5000 रुपये दंड आणि 1000 रुपये व्याज अशी रक्कम वसूल करण्याचा दबाव आणला होता, असे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.
अंत्यविधीला गेलेल्या ग्रामस्थांना आकारला दंड
फिर्यादींच्या वडिलांच्या अंत्यविधीस गावकऱ्यांनी सहभागी होऊ नये, असा फतवा आरोपींकडून काढण्यात आला. सहभागी झाल्यास त्यांनाही बहिष्कृत केले जाईल, असा इशारा देण्यात आला होता. तरीही सहभागी झालेल्या चंद्रकांत श्रीराम भगत, राहुल यशवंत काटकर, पदीबाई महादेव काटकर,धनंजय धनावडे यांना प्रत्येकी 5000 रुपये दंड ठोठावण्यात आला. त्यापैकी चंद्रकांत भगत व राहुल काटकर यांच्याकडून 10,000 रुपये प्रत्यक्ष वसूल केल्याचे तक्रारीत नमूद आहे. धनंजय धनावडे यांनी दंड न दिल्याने त्यांच्यावरही बहिष्कार टाकण्यात आल्याचा फिर्यादीचा आरोप आहे.