

विक्रम बाबर
पनवेल : नवीन पनवेल रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी सोमवारी (दि.8 डिसेंबर) सकाळच्या सुमारास मोठी दुर्घटना टळली. झोपड्यांच्या वरून जाणारी हाय टेन्शन वायर अचानक तुटून खाली पडल्याने लागलेल्या आगीत झोपड्या आणि पार्किंगमध्ये ठेवलेल्या दुचाकी वाहनांना आग लागली. या आगीत एका झोपडीत ठेवलेला गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने ज्वाळा आणखी भडकल्या आणि काही क्षण परिसरात पूर्ण घबराट पसरली. मात्र अग्निशामक दलाच्या तत्पर हस्तक्षेपामुळे मोठी जीवितहानी टळली.
प्रत्यक्षदर्शी सांगतात की, दुपारी अचानक जोराचा आवाज होताच हाय व्होल्टेज वायर झोपड्यांच्या भागात कोसळली. जमिनीवर पडताच वायरमध्ये स्पार्किंग सुरू झाली आणि काही सेकंदांतच तिथे झोपड्या व उभ्या असलेल्या दुचाकींना आग लागली. ज्वाळांचा भडका इतका मोठा होता की काही काळ संपूर्ण परिसरात धूर आणि आगीचा मारा दिसत होता.
घटनेची माहिती मिळताच पनवेल अग्निशामक दल, स्थानिक पोलीस आणि महापालिकेचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या पथकांनी पाण्याच्या फवाऱ्यांचा मारा करत अल्पावधीतच आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र झोपड्या आणि दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्राथमिक तपासात ही आग हाय टेन्शन वायर अचानक तुटल्याने लागली का अन्य काही कारणामुळे याचा शोध सुरू आहे.