अलिबाग: रायगड जिल्ह्यात उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून तापमानाबरोबरच आर्द्रतेत झालेल्या मोठ्या वाढीमुळे नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत रायगडमध्ये आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्याने घामाच्या धारांनी नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. जिल्ह्यात आद्रेतेचे प्रमाण 61 टक्क्यावर जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यभर उष्णतेची लाट पसरली असून कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, जळगाव आदी जिल्ह्यांमध्ये तापमान चाळिशीपार गेले आहे. मात्र, या भागांत हवामान तुलनेने कोरडे असल्याने उकाड्याची तीव्रता कमी जाणवते. उलट कोकण पट्ट्यात, विशेषतः रायगड जिल्ह्यात तापमान तुलनेने कमी असले तरी प्रचंड आर्द्रतेमुळे उष्णतेचा त्रास अधिक जाणवत आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, रायगडमध्ये बुधवारी आर्द्रतेचे प्रमाण तब्बल 61 टक्क्यांवर पोहोचले, तर मुंबईत ते 53 टक्के आणि इतर काही भागांत सुमारे 50 टक्क्यांपर्यंत होते. त्यामुळे रायगडमधील उकाडा अधिक तीव्र बनला आहे. किनारपट्टी भागातील अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन, उरण या तालुक्यांमध्ये समुद्राच्या जवळीकतेमुळे आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्याने नागरिकांना उष्णतेबरोबरच चिकट उकाड्याचा मोठा फटका बसत आहे. दिवसभर घाम येणे, अंगाला चिकटपणा जाणवणे आणि उष्णतेमुळे अस्वस्थता वाढणे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, पुढील दोन दिवस कोकण विभागात तापमानासह आर्द्रतेतही वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या आठवड्यात रायगडमध्ये कमाल तापमान 31 ते 34 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज असून त्यात 2 ते 3 अंशांची वाढ होऊ शकते. तसेच किमान तापमान 25 ते 27 अंश सेल्सिअस दरम्यान राहणार असून त्यातही 4 ते 5 अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे.
वाढत्या उष्णतेमुळे आणि आर्द्रतेमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून उष्माघात, थकवा आणि डिहायड्रेशनचा धोका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या कडाक्याच्या उन्हात बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे आणि हलका आहार घेणे यासारखी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. एकूणच, रायगड जिल्ह्यातील नागरिकांना येत्या काही दिवसांत कडक उन्हाबरोबरच प्रचंड आर्द्रतेचा दुहेरी फटका सहन करावा लागणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.