पोलादपुर येथे ट्रक उलटल्‍याने मुंबई - गोवा महामार्गावर वाहतूक विस्‍कळीत झाली Pudhari Photo
रायगड

Raigad Heavy Rain : रायगडमध्ये पावसामुळे दाणादान ! ‘सावित्री’ने गाठली धोक्‍याची पातळी, आंबेवाडी येथे दुकानांत पाणी

पोलादपुर येथे ट्रक उलटला, मुंबई-गोवा महामार्गावर एकेरी वाहतूक : सावित्री नदीचे रौद्र रुप (पहा व्हिडीओ)

पुढारी वृत्तसेवा

महाड/ कोलाड / पोलादपूर : रायगड जिल्‍ह्यात गेल्‍या २४ तासांत प्रचंड पाऊस सुरु असून, पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली आहे, अनेक रस्‍ते पाण्याखाली गेले असून, नद्यांना पूर आला आहे. सखल भागात पाणी साठून दुकांनामध्ये पाणी शिरले आहे व्यावसाईकांचे नुकसान झाले आहे. वाहतूक संथ गतीने सुरु आहे. अशातच पोलादपूर जवळ १२ चाकी ट्रक उलटल्‍याने मुंबई-गोवा महामार्गावर एकेरी वाहतूक सुरु आहे.

महाड परिसरात पूरसदृश्य स्थिती ! दस्तुरी नाक्यासह मच्छी मार्केट परिसरात पाणी शिरले! सावित्री नदीचे पाणी दुधडी भरून वाहू लागले

मागील 24 तासांपेक्षा जास्त काळापासून महाड शहरासह तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आता पूर सदृश्य स्थिती निर्माण केली असून शहराच्या सखल भागात म्हणजेच दस्तुरी नाका परिसर व मच्छी मार्केट मार्गावर सावित्री व गांधारी नदीचे पाणी शिरल्याची माहिती प्राप्त झाली आहे . सावित्री नदीने 6 पूर्णांक 50 ही धोक्याचा इशारा देणारी पातळी गाठल्याने नगर परिषदेमार्फत नागरिकांना सावधगिरीचा इशारा देणारा भोंगा वाजविण्यात आला आहे.

या संदर्भात प्राप्त झालेल्या महाड तहसील व नगरपरिषदेच्या आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्षातील माहितीनुसार तालुक्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी सकाळपासून सुरू असून सांदोशी वाळण कोंडी भागात झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीने सावित्री व काळ नदीचे पाणी दुधडी भरून वाहू लागले आहे. दरम्यान विन्हेरे विभागातील मौजे करंजाडी मस्के कोंड व मौजे नातोंडी धारेची वाडी या दरडग्रस्त गावात महाडच्या तहसीलदारांनी दिलेल्या सूचनेनुसार अतिवृष्टी व रेड अलर्ट चा इशारा देण्यात आला असून नागरिकांना स्थलांतर होण्याबाबत सूचना देण्यात आल्याची माहिती स्थानिक महसूल अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आली आहे.

आंबेवाडी नाक्यावर पूरस्थिती: ठेकेदाराच्या चुकीचा फटका व्यावसायिक आणि नागरिकांना

संततधार पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आंबेवाडी बाजारपेठेत तसेच रोहा कडे जाणाऱ्या द.ग. तटकरे चौकात पाणीच पाणी साचून पुरस्थिती निर्माण झाली असुन या पुराचे पाणी व्यावसायिकांच्या दुकानात शिरूर व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.तसेच यामधून मार्ग काढतांना वाहचालकांसहित प्रवाशी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याला जबाबदार संबंधित ठेकेदार दार असल्याचे बोलले जात आहे. निकृष्ठ दर्जाचे संबंधित ठेकेदारांनी केलेले काम पुन्हा एकदा समोर आले. याचा नाहक त्रास व्यावसायिकांसह प्रवाशी नागरिक यांना भोगावा लागत आहे. गणेश उत्सव आठ दिवसावर आला असुन यामुळे आंबेवाडी येथील व्यापारी वर्गानी आपल्या दुकानात माल भरून ठेवला आहे.परंतु दोन दिवस सतत पडत असलेल्या तुफान पावसामुळे पुरस्थिती निर्माण होऊन पुराचे पाणी दुकानात शिरून व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

पुराचे पाणी व्यावसायिकांच्या दुकानात शिरूर व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे

12 चाकी ट्रकला अपघात वाहतूक विस्कळीत !

मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर शहराच्या लगत असलेल्या चोळाई गावाजवळ आज दुपारच्या ३.४५ वाजताच्या सुमारास चिपळूण बाजूकडून मुंबई दिशेने जाणारा कंटेनर जी जे 10 टी व्ही 6550 सदरचा 12 चाकी ट्रक पलटी झाल्याची घटना घडली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी ट्रक सह साहित्य चे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सदर या कॉर्नर वर अति वेगाने उतरत असताना चालक सद्दाम महंमद माकोडा रा. गुजरात याचा ट्रक वरील ताबा सुटल्याने महामार्गावरील लोखंडी बॅरिकेट्स तोडून पलटी झाला आहे या अपघातात सुदैवाने चालक किरकोळ जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कंटेनर रस्त्यावरच उलटल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली असून महाकाय ट्रक महामार्गावर बॅरिकेट्सवर आडवा झाल्याने महामार्गावर दोन्ही बाजूने एकेरी वाहतूक सुरू आहे. या घटनेची माहिती समजतात सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे, पोलीस हवलदार रुपेश पवार, व श्री कोंढाळकर, सतीश कदम, यांच्यासह कशेडी महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक काही काळानंतर सुरळीत सुरू केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT