महाड; पुढारी वृत्तसेवा : महाड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत ७३ पैकी २२ ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्या आहेत. उर्वरित ५१ ग्रामपंचायतीमध्ये आज सकाळी सुरू झालेल्या मतदानात सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ७५ टक्के पेक्षा जास्त मतदान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तालुक्यातील एकूण २७ हजार ९८२ पुरुष तर २७८११ स्त्री अशी मतदार संख्या आहे.
दुपारी साडेतीनच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार १९३५१ पुरुष तर १८४०२ महिलांनी मतदान केले. याबाबतची माहिती महाड तहसील निवडणूक शाखेमार्फत नायब तहसीलदार कुडळ यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली. तालुक्याच्या ५१ ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या या सर्व निवडणुकांचे मतदान शांततेत संपन्न झाले असून या करिता महाड शहर तसेच ग्रामीण पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.
सायंकाळी उशिरा महाडमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकांमध्ये मतपेटी आणण्याची कामे सुरू झाले. मंगळवारी सकाळी आठ वाजता याच ठिकाणी मतमोजणी होणार असल्याचे महाड तहसील कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले. गेल्या दोन महिन्यापासून निवडणुकांचा धुरळा उडालेल्या या ५१ ग्रामपंचायतीमधील उमेदवारांचे भवितव्य आता मतपेटीत बंद झाले आहे .
एकूणच झालेल्या मतदानामध्ये महाड तालुक्यात सहा महिन्यापूर्वीच्या राजकीय घडामोडीनंतर मोठा फेरफार होण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त होत आहे. हे परिणाम पुढील निवडणुकांकरिता महत्त्वाचे ठरतील अशी प्रतिक्रिया राजकीय जाणकार तसेच ज्येष्ठ नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
हेही वाचा