गेल इंडिया वायू वाहिनीच्या अधिकारी-कर्मचारी वर्गाला शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे माघारी परतावे लागले. (Pudhari Photo)
रायगड

GAIL India Gas Project | गेल इंडिया गॅस प्रकल्पाला वाशी-पेण येथील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

Washi Pen Farmers Protest | मागण्या मान्य न झाल्यास तीव्र विरोध कायम राहणार

पुढारी वृत्तसेवा

Farmers Agitation vs GAIL India Gas Project Raigad

पेण : पेण तालुक्यातील वाशी गावहद्दीतील शेतजमिनींमध्ये गेल इंडिया गॅस प्रकल्पासाठी लाईन टाकण्याच्या कामाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. मोजणीसाठी आलेल्या गेल इंडिया वायू वाहिनीच्या अधिकारी-कर्मचारी वर्गाला शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे माघारी परतावे लागले.

२४ गाव विरोधी कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष काशिनाथ पाटील, राजन झेमसे, वाशीचे सरपंच संदेश ठाकूर, माजी सरपंच गोरख पाटील, मेघा म्हात्रे, नरेश मोकल, प्रकाश ठाकूर, अनंत पाटील, हेमंत पाटील, प्रितेश माळी आणि इतर शेतकरी बांधवांनी एकत्र येत, अधिकाऱ्यांना गावातून मोजणी करू दिली नाही. शेतकऱ्यांनी मागणी केली की, गॅस पाईपलाईन समुद्र खाडी किनारी जागेतून टाकण्यात यावी, अन्यथा प्रकल्पाला विरोध कायम राहील.

काही दिवसांपूर्वी प्रांत कार्यालयात झालेल्या बैठकीत खासदार धैर्यशील पाटील, प्रांताधिकारी प्रवीण पवार, गेल कंपनीचे अधिकारी आणि शेतकरी यांच्यात चर्चा झाली होती. बैठकीत ठरल्याप्रमाणे, गेल कंपनीने अहवाल सादर केल्यानंतरच पुढील कारवाई करावी, असा निर्णय झाला होता. मात्र, गेलचे अधिकारी पोलीस बंदोबस्तासह वाशी ग्रामपंचायत हद्दीत मोजणीसाठी गेले होते, यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप उसळला.

शेतकऱ्यांनी स्पष्ट केले की, खाडीकिनारी जागेतूनच पाईपलाईन टाकावी, अन्यथा कोणत्याही परिस्थितीत प्रकल्पास परवानगी दिली जाणार नाही. शेतकऱ्यांच्या आक्रमकतेमुळे अधिकारी शेवटी मोजणी न करताच माघारी परतले.

पेणमधील शेतकरी आणि गेल इंडिया वायू वाहिनी अधिकारी यांच्यात समन्वय साधण्यासाठी डिसेंबर २०२४ मध्ये खासदार धैर्यशील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. या बैठकीतही शेतकऱ्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली होती. मात्र, गेलचे अधिकारी शेतकऱ्यांच्या मागण्या दुर्लक्षित करत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास गेल इंडिया गॅस प्रकल्पाला तीव्र विरोध कायम राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT