

नाते ः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर किल्ले रायगडावर जाणार्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी अतिवृष्टी आणि हवामान खात्याच्या रेड व ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर पायरी मार्ग बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. या निर्णयामुळे रायगडावर येणार्या पर्यटकांचा हिरमोड झाला होता, तसेच गडाच्या पायथ्याशी व्यवसाय करणार्या स्थानिक उद्योजकांचेही मोठे नुकसान झाले होते.
मात्र, जनतेच्या भावना लक्षात घेऊन आणि स्थानिकांच्या मागणीनुसार जिल्हाधिकार्यांनी आज सुधारित आदेश जारी केला. या आदेशानुसार केवळ रेड किंवा ऑरेंज अलर्टच्या दिवशीच पायरी मार्ग बंद राहणार असून, इतर सर्व दिवशी पर्यटकांसाठी हा मार्ग खुला असणार आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी करताच महाड तालुका पोलिसांनी पायरी मार्गावर लावलेले बॅरेगेटिंग हटवले. त्यामुळे पुन्हा एकदा पर्यटकांना पायर्यांनी रायगड सर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या वेळी गडावर उपस्थित पर्यटक आणि स्थानिक व्यावसायिकांनी मोठ्या आनंदाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमवला.
स्थानिक व्यावसायिकांनी प्रशासनाचे आभार मानत सांगितले की, पायरी मार्ग बंद झाल्याने आमच्या रोजीरोटीवर मोठा परिणाम झाला होता. मार्ग खुला झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.