Raigad Fort Barricade Pudhari
रायगड

Raigad Fort Barricade: राज ठाकरे रायगड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर समाधीसमोरील तुटलेले बॅरिकेटर्स तातडीने दुरुस्त

‘पुढारी’च्या वृत्तानंतर प्रशासन जागे; शिवसमाधी परिसरातील सुरक्षाव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

महाड : श्रीकृष्ण बाळ /इलियास ढोकले

किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर असलेल्या लाकडी बॅरिकेटर्सला तडे गेल्याची व ते कापडी चिंध्यांनी बांधल्याचे वृत्त दैनिक पुढारीने दिले होते. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे 9 मार्च रोजी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून मनसेची सदस्य नोंदणीचा शुभारंभ करणार आहेत. रायगडावर आल्यावर तुटलेले बॅरिकेट्स पाहून राज ठाकरे पुरातत्त्व विभाग आणि रायगड प्राधिकरणासह राज्यातील सत्ताधारी महायुतीचे वाभाडे काढणार या धास्तीने तुटलेल्या बॅरिकेटर्सची आज तातडीने दुरुस्ती करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळाजवळील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लावलेला लाकडी बॅरिकेटर्सला तडे गेल्याने ते कापडी चिंध्यांनी बांधण्याची वेळ रायगड प्राधिकरण व पुरातत्व विभागावर आल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांवर प्रसिद्ध होताच राज्यातील सत्ताधारी महायुती मधील राज्यकर्ते व प्रशासन तसेच पुरातत्व विभाग व रायगड प्राधिकरण खडबडून जागे झाले.

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर यापूर्वी रायगड प्राधिकरणामार्फत करण्यात आलेल्या सहाशे कोटी रुपयांच्या कामांची गुणवत्ता नसल्याने अनेक कामे बोगस पद्धतीने व निकृष्ट दर्जाची झाल्याची चर्चा यापूर्वीच प्रसार माध्यमांमध्ये व राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपातमध्ये गाजली होती. याच पार्श्वभूमीवर यापूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील युनिस्कोचा दर्जा प्राप्त झालेल्या 11 किल्ल्यांमधील रायगड किल्ल्याचा समावेश असला तरी या किल्ल्याच्या दर्जा व नामांकन टिकून राहण्यासाठी निकषाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचा सल्ला

राज्य सरकारला दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळाजवळील लाकडी बॅरिकेटर्सला तडे गेल्याने ते चिंध्यांनी बांधण्याची वेळ आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याने ,या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती सरकारसह केंद्रीय पुरातत्व विभाग व रायगड प्राधिकरणाचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे समाचार घेणार या भीतीमुळेच रायगड प्राधिकरणाने तातडीने तुटलेल्या लाकडी बॅरिकेटच्या दुरुस्तीचे काम वेगाने केल्याची चर्चा रायगड किल्ल्यावर ऐकण्यास मिळाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT