महाड ः श्रीकृष्ण बाळ
राज्यात सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना दिवाळीच्या पहिल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर दीपोत्सवादरम्यान विज प्रवाह नसल्याने संपूर्ण रायगड किल्ला अंधाराच्या खाईत लोटला होता .याचे वृत्त जाहीर झाल्यानंतर व त्यातच रायगड किल्ल्यावरील मागील नऊ महिन्यापासून वीज बिल थकल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पुरातत्व विभागाला जाग आली व प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांनी या प्रकाराची तात्काळ दखल घेतल्याने पुरातत्व विभागाने अखेर वीज वितरण कंपनीला दंडासहित 56 हजार 510 रुपये 29 ऑक्टोबर रोजी अदा केले असल्याची माहिती विद्युत वितरण विभागाच्या महाड उपविभागीय कार्यालयातून प्राप्त झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावरील विज बिल मागील नऊ महिन्यांपासून थकले होते. याबाबत केंद्र शासनाच्या तिजोरीत खडखडाट असल्याने वीज बिल थकले का? असे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर या वृत्ताने सर्वप्रथम राज्य सरकार व केंद्र सरकार खडबडून जागे झाले. त्यातच रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजी राजे हे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात प्राधिकरणाच्या नियमित बैठकीसाठी आले असता त्यांनी संबंधित थकीत विज बिल भरण्यासाठी सी.एस.आर. फंडातून निधी उपलब्ध केला जाईल असे सांगितले होते. तेव्हा तात्काळ पुरातत्त्व विभागाने महाड येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात 9 महिन्याच्या दंडासहीत. थकीत वीज बिल 56 हजार 510 रुपये वीज मंडळाच्या महाड येथील कार्यालयात 29 ऑक्टोबर रोजी भरल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
रायगड किल्ल्यावर असणारे सौर ऊर्जेचे दिवे बंद झाले असल्याने व पुरातत्व खात्याच्या दुर्लक्षतेमुळे किल्ल्यावरील कार्यक्रम काळोखात करावा लागल्याच्या प्रतिक्रिया उपस्थित शिवभक्तांनी व्यक्त केल्या होत्या. दिवाळी सणाच्या पहिल्याच दिवशी किल्ले रायगडावर (दीपोत्सव) शिवचैतन्य सोहळा शिवराज्याभिषेक दिन उत्सव सेवा समिती व दुर्गराज रायगडच्या वतीने किल्ले रायगडावर दिवाळीच्या पहिल्याच दिवशी दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पहिला दिवा माझ्या राजाच्या चरणी या भावनेतून हा कार्यक्रम साजरा होता केला या कार्यक्रमाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवभक्त रायगडावर दाखल झाले होते.
रायगड किल्ल्याला जागतिक मानांकन प्राप्त तरी...
एकूणच चार महिन्यांपूर्वीच जागतिक मानांकन दर्जा प्राप्त झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूण बारा किल्ल्यांमधील सर्वात महत्त्वाचा व राजधानीचा किल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगड बाबत झालेला हा दुर्दैवी प्रसंग भविष्यात पुन्हा होऊ नये यासाठी स्थानिक प्रशासनासह संबंधित विभागाने व जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी अशी अपेक्षा शिवभक्तांकडून व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील राजकीय पक्षांचे मौन आश्चर्यकारक
किल्ले रायगडावरील केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या नऊ महिने थकबाकी असलेल्या बिलाबाबत वृत्त प्रकाशित झाल्यानंतरही रायगड जिल्ह्यातील महाडसहित जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते मंडळींकडून घेण्यात आलेल्या चुप्पीबाबत सर्वसामान्य नागरिक व शिवभक्तांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया देण्यात न आल्याने या राजकीय नेत्यांच्या भूमिकेबाबत नागरिकांमध्ये खेद व्यक्त होत असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान केंद्रीय पुरातत्व विभागाने थकीत बिले भरल्यानंतर याच प्रमाणे जिल्हा परिषदेच्या ही बाकी असलेल्या वीज बिलाची रक्कम भरण्यात येणार असल्याची माहिती अलिबाग येथे बुधवारी झालेल्या रायगड प्राधिकरणाच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर संबंधित विभागाकडून देण्यात आल्याचे समजते.
दरम्यान केंद्रीय पुरातत्व विभागाच्या किल्ले रायगड प्रभारी काम पाहणाऱ्या राजेश दिवेकर यांनी यासंदर्भात एक व्हिडिओ प्रकाशित केला असून त्यामध्ये त्यांनी आपले पाचाड येथील विभागाचे कार्यालय महाड येथे हलवण्यात आल्याचे स्पष्ट करून या ठिकाणी संबंधित बिले न आल्याने ती भरली गेली नसल्याचे नमूद केले आहे. संबंधित बिले तातडीने अदा केली जातील असे स्पष्ट करून या संदर्भात समाज माध्यमांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.