नातेखिंड परिसरात दोन्ही बाजूंनी असलेल्या डोंगर फोडण्याच्या बहुप्रतिक्षित कामाला अखेर सुरुवात झाली Pudhari
रायगड

Raigad News | किल्ले रायगडकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील नातेखिंडीतील डोंगर फोडण्याच्या कामास प्रारंभ

नातेखिंड हा परिसर किल्ले रायगडकडे जाणाऱ्या पर्यटकांसाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा

पुढारी वृत्तसेवा

Mahad Raigad Road

नाते : महाड तालुक्यातील किल्ले रायगडकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील नातेखिंड परिसरात दोन्ही बाजूंनी असलेल्या डोंगर फोडण्याच्या बहुप्रतिक्षित कामाला अखेर सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील अरुंद व धोकादायक रस्त्यामुळे वारंवार अपघात घडत होते. विशेषतः पावसाळ्यात रस्त्यावरील खड्डे, घसरण आणि सतत होणारी वाहतूक कोंडी ही येथील गंभीर समस्या बनली होती.

नातेखिंड हा परिसर किल्ले रायगडकडे जाणाऱ्या पर्यटकांसाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. देश-विदेशातून येणारे पर्यटक, शिवप्रेमी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात या मार्गाचा वापर करतात. मात्र डोंगर कडेला असलेल्या अरुंद रस्त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. त्यामुळे या ठिकाणी डोंगर फोडून रस्ता रुंदीकरण करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती.

अखेर राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत नातेखिंड येथील डोंगर फोडण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या कामामुळे रस्त्याची रुंदी वाढणार असून वाहनचालकांसाठी अधिक सुरक्षित व सुकर मार्ग उपलब्ध होणार आहे.

किल्ले रायगडकडे जाणाऱ्या रस्त्याचे बहुतांश काम अंतिम टप्प्यात असून नातेखिंड आणि वालसुरे येथील पुलांचे काम शिल्लक होते. त्यापैकी नातेखिंड येथील डोंगर फोडण्याचे काम सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. प्रस्तावित रुंदीकरणामुळे भविष्यात अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

या कामाचे स्थानिक नागरिक, वाहनचालक तसेच पर्यटकांनी स्वागत केले आहे. मात्र कामादरम्यान योग्य सुरक्षितता उपाययोजना, प्रभावी वाहतूक नियोजन आणि पर्यावरणीय संतुलनाची काळजी घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. हे काम लवकर पूर्ण होऊन रायगडकडे जाणारा प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर व सुखकर व्हावा, अशी सर्वसाधारण अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT