Raigad Fort Road Pudhari
रायगड

Raigad Fort Road: रायगड गडाकडे जाणारा खर्डी–नेवाळी मार्ग धोकादायक; लाखो खर्चूनही रस्ता अद्याप जोखमीचा

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तयार केलेला पर्यायी मार्ग वादात; तीव्र उतार आणि अवघड वळणांमुळे पर्यटकांमध्ये भीती

पुढारी वृत्तसेवा

महाड : श्रीकृष्ण बाळ

किल्ले रायगडाच्या परिसराचा विकास रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून होत असतानाच सातत्याने होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खर्डीनगर भवन नेवाळी वाडी ते किल्ले रायगड असा मार्ग सन 2024 मध्ये काढण्यात आला. मात्र हा मार्ग वर्षभरातच बंद ठेवण्याची पाळी प्रशासनावर आली होती. त्यानंतर सलग दोन वर्ष सातत्याने बदल करण्याच्या नादात लाखो रुपये खर्च झाले मात्र आजही हा रस्ता धोकादायकच स्थितीतच आहे.

किल्ले रायगडाचा विकास झपाट्याने होत असल्याने या ठिकाणी अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून पर्यटक, शिवप्रेमी मोठ्या संख्येने गडावर येवू लागले आहेत. किल्ल्याकडे जाण्यासाठी असलेल्या महाड रायगड या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी होत होती. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या रस्त्याचे देखील रुंदीकरण झाले असून आणखी एक पर्याय म्हणून रायगड रोप वे पासून नेवाळी - खर्डी - असा मार्ग तयार करण्यात आला आहे.

2024 मध्ये हा रस्ता अस्तित्वात आला आणि अल्पावधीतच हा रस्ता बंद ठेवण्याची वेळ आली. तीव्र उतार आणि चढ चढताच दिलेली अवघड वळणे यामुळे हा मार्ग धोकादायक असल्याच्या आणि शिवप्रेमी तसेच पर्यटकांच्या जीवाशी खेळ खेळणारा असल्याने झालेल्या तक्रारीनंतर बंद ठेवावा लागला. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या पर्यायाकडे शिक्षित अभियंत्यांनी दुर्लक्ष केल्याने ही परिस्थती ओढवली आहे. त्यानंतर सातत्याने दोन वेळा या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली.

नेवाळी गावापासून पुढे हा रस्ता जोडण्यासाठी आम्ही पर्याय दिला होता मात्र येथील अधिकाऱ्यांनी ऐकले नाही त्यामुळे हि अवस्था निर्माण झाली आहे.
यशवंत आखाडे, स्थानिक नागरिक

घाटातील तीव्र वळणे धोक्याची

नेवाळी गावाच्या खालील बाजूला असलेल्या घाट मार्गावर तीव्र वळण आणि उतार ठेवण्यात आला आहे. याठिकाणीं आता दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे. रस्ता रुंद करण्याचे काम करण्यात आले आहे. मात्र आजही तीव्र उतार आणि अवघड वळणे यामुळे स्थानिक नागरिक देखील प्रवास टाळतात.

खर्डी नेवाळी रस्ता करताना येथील भौगोलिक स्थितीचा विचार केला नाही. ठेकेदारांच्या फायद्यासाठी काम करत आहे. या रस्त्यावर अपघात झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी.
सुभाष मोरे, सामाजिक कार्यकर्ते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT