

रायगड ः राज्यातील २९ महानगरपालिकांच्या चुरशीत पनवेल महानगरपालिकेने ई-गव्हर्नन्स आणि प्रशासकीय सुधारणांमध्ये बाजी मारली आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या '१५० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा' उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या 'ई-गव्हर्नन्स सुधारणा व सेवाकर्मी प्लस' कार्यक्रमात पनवेल महानगरपालिकेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या देदीप्यमान यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांच्या शुभहस्ते पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांना विशेष सन्मानपत्र प्रदान करुन गौरविण्यात आले.
यशाचे गमक: पारदर्शकता आणि तंत्रज्ञान
मुख्यमंत्र्यांच्या लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी प्रशासनाच्या संकल्पनेला प्रत्यक्ष उतरवण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला. उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली पालिकेने विविध नागरी सेवा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या, ज्यामुळे प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणि वेग आला आहे.
आयुक्तांकडून यशाचे श्रेय टीमवर्कला
मिळालेल्या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त करताना आयुक्त मंगेश चितळे म्हणाले की, हे यश केवळ एका व्यक्तीचे नसून पनवेल महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सांघिक प्रयत्नांचे फळ आहे. लोकप्रतिनिधींची साथ आणि पत्रकारांचे सहकार्य यामुळेच आम्ही ही कामगिरी करू शकलो. हा सन्मान आम्हाला अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देणारा आहे. ई-गव्हर्नन्स आणि प्रशासकीय सुधारणां या स्पर्धेत राज्यातील एकूण २९ महानगरपालिकांमध्ये मूल्यांकन करण्यात आले. त्यात पनवेल महानगरपालिकेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.