

रायगड : जयंत धुळप
कोकणातील काळी मिरी हे पीक प्रामुख्याने नारळ आणि सुपारीच्या बागेत आंतरपीक म्हणून घेतले जाते. आर्थिकदृष्ट्या विचार करता कोकणात काळी मिरीला ‘काळे सोने’ म्हटले जाते. गेल्या काही वर्षांत व्यावसायिक दृष्टिकोनातून काळी मिरी लागवडीत मोठी वाढ होत आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने संशोधन करून पन्नीयूर-1 व पन्नीयूर-5 या काळी मिरीच्या व्यावसायिक उत्पन्न देणाऱ्या दोन जाती कोकणातील बागायतदार शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या आहेत. परिणामी, काळी मिरी लागवडीखालील क्षेत्रात वाढ होऊन ते 555 हेक्टर झाले असल्याची माहिती विद्यापीठाचे कृषी विस्तारशास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी दिली.
देशातील एकूण काळी मिरी उत्पादनापैकी 98 टक्के उत्पादन केरळ राज्यात होते. त्या खालोखाल कर्नाटक व तामीळनाडूमध्ये होते. आता कोकणातील नारळ, सुपारी बागायतदारांना काळी मिरीचे व्यावसायिक मूल्य लक्षात आल्याने कोकणातील पाचही जिल्ह्यांत काळी मिरीची आंतरपीक म्हणून लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. भारतातून मसाल्याचे जे पदार्थ निर्यात होतात त्यातून प्राप्त होणाऱ्या एकूण परकीय चलनापैकी 70 टक्के परकीय चलन काळ्या मिरीतून मिळत आहे. कोकणातील पाचही जिल्ह्यांत काळी मिरीचे उत्पादन घेतले जाते; परंतु रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे यात आघाडीवर आहेत.
कोकणातील नारळ-सुपारीच्या बागेत वेलांना आधार देण्यासाठी वेगळा खर्च करावा लागत नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या निव्वळ नफ्यात 20 ते 25 टक्क्याने वाढ होते. सद्यस्थितीत कोकणातील सुमारे 40 हजार शेतकरी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे काळी मिरी उत्पादनाशी जोडले गेले आहेत. मिरीची काढणी, निवड आणि वाळवणे या कामात ग्रामीण भागातील महिला बचत गटांना रोजगार मिळू लागला आहे.