Raigad News Pudhari
रायगड

Raigad News: हिरकणी बुरुजापासून बाजारपेठेच्या मागच्या बाजूपर्यंत तटबंदीची दुरुस्ती होणार; रायगड विकास प्राधिकरणाचा धोरणात्मक निर्णय

महादरवाजाच्या वरून हिरकणी बुरुज ते बाजारपेठेच्या मागील भागापर्यंत तटबंदी; रायगड प्राधिकरणाकडून दुरुस्तीचे नियोजन

पुढारी वृत्तसेवा

श्रीकृष्ण बाळ

महाड: हिंदवी स्वराज्याची राजधानी राहीलेल्या किल्ले रायगडावरील स्थापत्य शास्त्रासंदर्भात साडेतीनशे वर्षांनंतरही आज आश्चर्याची भावना व्यक्त होत आहे.

किल्ले रायगडावरील महादरवाजाच्या वरच्या बाजूस, हिरकणी बुरुजापासून ते बाजारपेठेच्या मागच्या बाजूपर्यंत तटबंदी असल्याचे निदर्शनास आले असून, या तटबंदीच्या दुरुस्तीची कामे रायगड प्राधिकरणातर्फे येणाऱ्या काळात हाती घेण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

या संदर्भात प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किल्ले रायगडावरील महादरवाजाचे स्थापत्यशास्त्र आजही जगभरातील अभियांत्रिकी क्षेत्रातील मान्यवरांना थक्क करून सोडणारे आहे.

याच भागात, हिरकणी कड्यापासून ते बाजारपेठेपर्यंत किल्ल्याच्या उताराच्या बाजूने ही तटबंदी कशी बांधण्यात आली असावी, असा प्रश्न १६७३ मध्ये किल्ले रायगडाला भेट दिलेल्या टॉमस निकल्सन यांनी आपल्या लिखाणात उपस्थित केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ६ जून १६७४ रोजी झालेल्या राज्याभिषेक सोहळ्याला हेन्री ऑक्सिडन हा इंग्रज अधिकारी उपस्थित राहिला होता. त्यापूर्वी टॉमस निकल्सन यांनी किल्ले रायगडाला दिलेल्या भेटीची नोंद ऐतिहासिक दस्तऐवजांतून समोर आली असून, त्यामध्ये त्यांनी किल्ले रायगडाच्या तटबंदीचे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे कौतुक केले आहे.

राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर किल्ले रायगडावरील पाण्याचा वापर होणारी कामे बंद ठेवण्यात आली असली, तरी अशा प्रकारच्या 'ड्राय वर्क' (पाण्याशिवाय होणारी कामे) स्वरूपाच्या कामांना रायगड प्राधिकरणाकडून प्राधान्याने हाती घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

एकूणच, साडेतीनशे वर्षांपूर्वी बांधलेल्या किल्ले रायगडाच्या स्थापत्यशास्त्राचा अभ्यास आज २१ व्या शतकातील अभियंत्यांनाही चकित करणारा ठरत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT