Raigad Fort : किल्ले रायगडावरील पायरी मार्ग २८ व २९ मे रोजी राहणार बंद! File Photo
रायगड

Raigad Fort : किल्ले रायगडावरील पायरी मार्ग २८ व २९ मे रोजी राहणार बंद!

शिवभक्‍तांच्या सुरक्षेसाठी उंच कड्यावरील मोकळे दगड काढण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

Raigad fort access via stairs will be closed on 28th and 29th May

नाते : इलियास ढोकले

किल्‍ले रायगडावर ६ जून रोजी तारखेनुसार शिवराज्‍याभिषेक सोहळा होणार आहे. तर तिथीनुसार ९ जून रोजी राज्‍याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी राज्‍यासह देशभरातून शिवभक्‍त मोठ्या संख्येने हजेरी लावतात. त्‍या पार्श्वभूमीवर शिवभक्‍तांच्या सुरक्षिततेसाठी रायगड किल्‍ल्‍याच्या उंच कड्यावरील मोकळे दगड खाली घेण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. त्‍यासाठी २८ आणि २९ मे रोजी गडाचा पायरी मार्ग बंद ठेवण्याचे आदेश जिल्‍हाधिकारी किशन जावळे यांनी काढले आहेत.

2023 यावर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आलेल्या एका शिवभक्ताचा महादरवाज्याच्या खालील बाजूस असलेल्या उंच कड्यावरून पडलेल्या दगडामुळे मृत्यू झाला होता. ही गंभीर घटना लक्षात घेऊन चालू वर्षी राज्याभिषेक सोहळ्याच्या अगोदर सदर ठिकाणाहून उंच कड्यावरील मोकळे दगड काढून घेणे आवश्यक असल्याने ते प्रशिक्षित रेपलर च्या मदतीने काढण्यात येणार आहेत. दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई यांनी या कामासाठी सहमती दर्शवली आहे.

येथे 28 व 29 मे रोजी ही मोहीम राबविण्यात येणार असल्याने या दोन दिवशी पायरी मार्गाने गड चढून जाण्यासाठी मनाई करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सदर राज्याभिषेक सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती राहणार असल्याने गर्दी व्यवस्थापनाच्या अनुषंगाने उपाययोजना करणे आवश्यक आहे.

यासंदर्भात कार्यकारी अभियंता विशेष पथक रायगड किल्ला महाड प्रतिष्ठान मुंबई यांनी सदर दोन दिवशी योग्य ती खबरदारी घेऊन मोकळे दगड हटवण्याचे काम पूर्ण करावे व याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक रायगड यांनी चित्तदरवाजा, नाणे दरवाजा, गडावरील शिरकाई मंदिर, होळीचा माळ व इतर आवश्यक ठिकाणी पायी मार्गावरील जाण्याच्या प्रवेशद्वारावर आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात करून हा मार्ग पायी वाटचालीसाठी बंद ठेवावा, मात्र या कालावधीत रायगड रोपेची सुविधा सुरू राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या प्राप्त अधिकारानुसार दिनांक 28 व 29 या दोन दिवशी गडावरील पायी वाटचालीचा मार्ग बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी लेखी आदेशानुसार दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT