रायगड ः जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान केले आहे. शासनाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत. तरी जिल्ह्यातील नजरपाहणी अहवालानुसार बारा तालुक्यातील 182 गावांतील 2 हजार 946 शेतकर्यांच्या 746 हेक्टर क्षेत्रावरील भातपिकाचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा हा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे प्रत्यक्ष नुकसान मोठी असण्याची शक्यता आहे.
रायगड जिल्ह्यात अद्याप काही तालुक्यांमधून नजरपाहणी अहवाल आलेला नाही. मात्र, ज्या तालुक्यातील अहवाल आला आहे, त्यानुसार राज्य सरकारने रायगड जिल्हाधिकार्यांना नुकसानभरपाईचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार संबंधित विभागातील तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक यांच्या मदतीने प्रत्यक्ष स्थळपाहणी करून अहवाल सादर करावे लागणार आहेत. पेण, अलिबाग, रोहा, महाड या तालुक्यांमध्ये नुकसानीचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या 15 दिवसांपासून सखल भागातील भातशेतीत पाणी साचले आहे. नुकतेच लावलेली रोपे कुजल्याने दुबार लावणीचे संकट ओढवल्याचे शेतकरी सांगतात.
पावसाचा जोर कमी झाल्यावर खलाटीतील पाणी कमी होऊ लागल्याने झालेले नुकसान दिसू लागले. याचबरोबर खालापूर, कर्जत, सुधागड, माणगाव या तालुक्यांमध्येही भातशेतीचे नुकसान वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 12 तालुक्यांमधील नजर पाहणी अहवाल सादर झाले आहेत. श्रीवर्धन, म्हसळा, मुरूड, पोलादपूर, सुधागड या डोंगराळ तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला. डोंगर उतारावरील शेतीत पाण्याच्या प्रवाहाबरोबर माती, दगडगोटे वाहून आल्याने मोठे नुकसान झाल्याच्या तक्रारी शेतकर्यांनी संबंधित कृषी अधिकार्यांकडे नोंदवल्या आहेत.
अलिबाग तालुक्यातील 24 गावांमधील 187 शेतकर्यांची 57.70 हेक्टर, पेण 28 गावांमधील 659 शेतकर्यांची 215.00 हेक्टर, मुरूड 39 गावांमधील 654 शेतकर्यांची 51.00 हेक्टर, कर्जत 2 गावांमधील 2 शेतकर्यांची 00.29 हेक्टर, खालापूर 26 गावांमधील 55 शेतकर्यांची 16.80 हेक्टर, उरण 27 गावांमधील 1239 शेतकर्यांची 380.65 हेक्टर, माणगाव 3 गावांमधील 23 शेतकर्यांची 7.72, रोहा 4 गावांमधील 7 शेतकर्यांची 2.20 हेक्टर, महाड 8 गावांमधील 33 शेतकर्यांची 6.15 हेक्टर, पोलादपूर 1 गावामधील 5 शेतकर्यांची 0.46 हेक्टर, म्हसळा 17 गावांमधील 40 शेतकर्यांची 7.00 हेक्टर, श्रीवर्धन 3 गावांमधील 6 शेतकर्यांची 1.35 हेक्टर जमीन अशी एकूण जिल्ह्यातील 182 गावांमधील 2946 शेतकर्यांची 746.32 हेक्टर जमिनीवरील भातपीक कुजले आहे. पनवेल, सुधागड-पाली, तळा तालुक्यातील नजर पाहणी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.
शेतीचे नुकसान ठरवण्यासाठी लवकरात लवकर अद्ययावत प्रणाली विकसित करावी, जेणेकरून ही नुकसानभरपाई अधिक पारदर्शकतेने व अचूकपणे देता यावी, असा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ही प्रणाली सुरू होईपर्यंत प्रचलित पद्धतीने नुकसानभरपाईच मिळणार आहे. 1 जुलै रोजी यासंदर्भात झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत, सामान्यकृत फरक वनस्पती निर्देशांक (एनडीव्हीआय) निकषासाठी जोपर्यंत कृषी विभागामार्फत अद्ययावत प्रणाली तयार होत नाही, तोपर्यंत प्रचलित धोरणांप्रमाणे शेतीपिकांची नुकसानभरपाई देण्याबाबत निर्णय झाला आहे.