

महावितरच्या मान्सून पूर्व तयारी व भोंगळ काराभारामुळे गेल्या काही महिन्यात वारंवार खंडित विद्युत पुरवठ्यामुळे नागरिक त्रासले गेले असल्याचे चित्र कर्जत तालुक्याचे आहे. तर महावितरणच्या या भोंगळ कारभाराचा फटका हा आरोग्य व्यवस्थेला देखील बसला आहे. नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल गरोदर मातेला मध्यरात्री प्रसूती कळा सुरू झाल्या. मात्र गेले चार दिवस लाईट नसल्याने नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित डॉक्टर व परिचारिका यांनी रुग्णाची स्थिती पाहून प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. मेणबत्ती व मोबाईलचा उजेड याच्यामध्ये त्या महिलेची सुरक्षित प्रसूती करण्यात आली.
शहरात शासकीय आरोग्य सेवा देण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे एकमेव नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. अशात गेले काही दिवस कर्जत तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसासह सोसाट्याच्या वारा सुरू होता. त्यामुळे कर्जत तालुक्यातील अधिकांश भाग अंधारात लुप्त झाला होता. तेव्हा नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील विद्युत पुरवठा देखील खंडित झाला होता. अगोदरच दोन दिवस लाईट नसल्याने आरोग्य केंद्रातील इन्व्हर्टर सुद्धा संपला. त्यातच 25 जुलैच्या मध्यरात्री त्यातील एका महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या. त्यामुळे उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉ. महावीर बुंधरडे व परिचारिका यांनी आपले कौशल्यपणाला लावत मेणबत्तीच्या व मोबाईल लाईटच्या प्रकाशात प्रसूती करण्याच्या निर्णय घेतला. डॉक्टर व कर्मचारी यांचे कौशल्य कामी आले व त्या महिलेची 26 जुलै रोजी सकाळी 5 वाजता प्रसूती झाली. डॉक्टरांनी जोखीम घेऊन बाळ व बाळंतीण यांचे जीव वाचवले आहेत. दरम्यान ही बाब दुसर्या दिवशी परिसरातील नागरिकांना समजताच त्यांनी महावितरण विरोधात संताप व्यक्त केला आहे.
नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या आहे. तर गरोदर मातांचे प्रमाण देखील अधिक आहे. अशात गेले चार दिवस येथे विद्युत पुरवठा खंडित होता. त्यामुळे मेणबत्ती व मोबाईलच्या उजेडात आम्हाला प्रसूती करावी लागली. तर लाईट नसल्याने पाणी देखील त्यासाठी आम्हाला बाहेरून पाण्याचा टँकर मागवावा लागला. महावितरणचा हा त्रास आम्हाला नेहमीच सहन करावा लागतो.
- डॉ. महावीर बुंधरडे, वैद्यकीय अधिकारी नेरळ
सगळीकडे लाईट असताना फक्त आमच्या परिसरात व नेरळ आरोग्य केंद्रात लाईट नव्हती. आम्ही अनेकदा महावितरणच्या अधिकार्यांना फोन करून याबाबत कल्पना देण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र ते फोनही उचलत नाही तसेच कर्मचारी यांना सांगून देखील ते आले नाहीतm
- अरविंद कटारिया, स्थानिक ग्रामस्थ
नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात वायरचा फॉल्ट होता. तो 26 जुलै रोजी आम्ही स्वतः अधिकार्यांसह जाऊन पहिला आणि दूर केला आहे. तर नागरिकांच्या या भागातून तक्रारी असल्याने आज आम्ही स्वतः या ठिकाणी भेट घेऊन विद्युत पुरवठा सुरळीत केला आहे.
- प्रकाश देवके, उपअभियंता महावितरण उपविभाग कर्जत