Raigad fishing season pudhari photo
रायगड

Raigad fishing season : मुरुडमधील मच्छीमारांसाठी दिवाळी हंगाम जाणार सुगीचा

पर्यटकांमुळे ताज्या मच्छीला वाढणार मागणी; कोळीबांधवांची कडक उन्हात मासळी सुकविण्याची लगबग

पुढारी वृत्तसेवा

मुरुड जंजिरा : रायगड जिल्ह्यात सध्या मच्छीमारीसाठी हवामान अत्यंत अनुकूल आहे. त्यामुळे चांगल्याप्रकारे मासेमारी सुरू आहे. तर येत्या दिवाळीपासून जिल्ह्यात पर्यटक वाढणार आहे. यामुळे मच्छीची मागणीतही वाढ होणार असून या वर्षीच्या दिवाळीत मच्छीच्या हंगामासाठी सुगीचे दिवस असतील असा विश्वास मच्छिमारांकडून व्यक्त केला जात आहे.

दिवाळी हंगाम पर्यटनाच्या दृष्टीने चांगला जावा यासाठी समस्त कोकण तयारीत आहेत. कोकणात येणारा पर्यटक दिवाळीची गुलाबी थंडी व ताजे मासे खाण्यासाठी येतो. मनसोक्त समुद्राच्या लाटांचा आनंद व शिवरायांचे जलदुर्ग पाहण्यासाठी येतो. येथे समुद्रकिनारी असणारे हॉटेल व्यावसायिक चांगली सेवा दिल्याने येणारे पर्यटक खुश होतात.

पर्यटकांची सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे ताजी मासळी पापलेट, सुरमई, रावस, जिताडा, कोळंबी. दिवाळीच्या सुटीत वर्ष भर पुरेल एवढे ताजे कोळंबीचे सोडे मोठ्या प्रमाणात खरेदी केले जातात. मुरुड व राजपुरी येथील सोडे प्रसिद्ध आहेत.

कोणताही वेगळा वास न येणारे सोडे फक्त मुरुडला मिळतात, त्यामुळे सोडे खरेदीत सुमारे २५ लाखांची उलाढाल होते. मुरुड, राजपुरी, नांदगाव गावातील महिला विकत घेऊन ऑक्टोबरच्या कडक उन्हात सुकवण्याच्या कामात मग्न आहेत. सोडे बनवण्यास जागा कमी पडते.

सुक्या मासळीला मागणी वाढली आहे. ऑक्टोबरच्या कडक उन्हात सुरमई, हलवा, बॉबील, अंबाडी, सुकट, पांढरी सुकट, कोळी महिलांनी मोठ्या प्रमाणात सुकवली व दिवाळीसाठी साठवली. पर्यटकांची चांगली साथ मिळाली तर कोळी आर्थिकदृष्टाय सक्षम होईल.

कोळी महिलांना मासळी सुकवण्यासाठी सुरक्षित जागा नसल्याने सुक्या मासळीचे उत्पादन बनवण्यावर बंधन आहे. कोळी महिलांची अनेक वर्षांची मागणी आहे कि मासळी सुकवण्यासाठी समुद्रकिनारी काँक्रीटचे ग्राउंड पाहिजे, जेणेकरून सुकलेल्या मासळीला स्वच्छ करणे सोपे जाते व मासळीचा दर्जा उत्तम होतो.

मासेमारीतून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल देखील होत असते. कोकणातून परदेश आणि परराज्यात देखील मासे पाठवले जातात. शिवाय त्यावर प्रक्रिया करणार देखील उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. परिणामी वर्षाला कोट्यवधींची उलाढाल या व्यवसायातून होते. परंतु मुरुडकडे त्यादृष्टीने पहिले जात नाही.

मच्छिमारांसाठी रायगडला कोणताही चांगला प्रकल्प आला नाही. येथील मच्छिमारांचे मासेमारीत कौशल्य बघता यथील मासळीला मुरुडलाच मार्केट मिळाले तर कोळी बांधवांचा डिझेल खर्च वाचले व मासे परदेशात नेणाऱ्या कंपन्यांमुळे येथील युवकांना रोजगार मिळेल यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करण्याची गरज आहे.

गेली दोन वर्ष मच्छिमारांचा व्यवसाय पूर्णतः कमी झाला होता. यावर्षी मासळी मिळाली पण पूर्वीसारखी नाही, पण कोळी बांधव समाधानी आहे. पूर्वी दिवाळी हंगामात ५० लाखांहून अधिक उलाढाल होत असे. आता पर्यटक संख्या कमी झाल्याने अजूनही मंदीची लाट आहे. सरकारने कोळी बांधवाच्या सवलती बंद केल्याने अनेक कोळी कुटुंब खचलेत व मासेमारी सोडून इतर कामधंदे करत आहेत. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
मनोहर बैले, मच्छीमार, मुरुड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT