Raigad Emergency Mobile Alert Pudhari
रायगड

Raigad Emergency Mobile Alert: रायगडभर हजारो मोबाईलवर अचानक इमर्जन्सी अलर्ट! 'पुढील तीन तासांत अतिमुसळधार पाऊस'

'पुढील तीन तासांत अतिमुसळधार पाऊस'; रायगडभर एकाच वेळी मोबाईल खणाणले...!

पुढारी वृत्तसेवा

शरद निकुंभ

रायगड: रायगड जिल्ह्यात मंगळवारी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास एकाच वेळी हजारो मोबाईलवर इमर्जन्सी अलर्टचा कर्कश आवाज घुमल्याने संपूर्ण जिल्ह्यात काही काळ गोंधळ, आश्चर्य आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.

बँका, शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, देवस्थाने, बाजारपेठा आणि घराघरांमध्ये एकाच वेळी मोबाईलची रिंग वाजल्याने नेमके काय घडले, असा प्रश्न प्रत्येकालाच पडला.

सुरुवातीला अनेकांना एखाद्याच्या मोबाईलची रिंग वाजत असल्याचे वाटले. मात्र काही क्षणांत प्रत्येकाने स्वतःचा मोबाईल पाहिला असता सर्वांच्याच स्क्रीनवर एकच आपत्कालीन संदेश झळकत असल्याचे दिसून आले. त्यामुळे हा इशारा संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी देण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

सुधागड तालुक्यातील आत्मनोती विद्यामंदिर, जांभुळपाडा येथे त्यावेळी पालकसभा सुरू होती. सभागृहातील शिक्षक, पालक आणि कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर एकाच वेळी अलर्टचा आवाज घुमल्याने काही क्षण सर्वजण स्तब्ध झाले.

पालकसभेतील चर्चाही काही काळ थांबली. त्यानंतर प्रत्येकाने मोबाईल तपासल्यानंतर हा संदेश सर्वांनाच प्राप्त झाल्याचे लक्षात आले. मोबाईलवर प्राप्त झालेल्या संदेशात 'रायगड जिल्ह्यात पुढील तीन तासांत अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून नागरिकांनी सावधान राहावे,' असा स्पष्ट इशारा देण्यात आला होता.

त्यानंतर अनेकांनी आपल्या नातेवाईकांना फोन करून माहिती दिली, तर सोशल मीडियावरही या अलर्टची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली. महाराष्ट्र किनारपट्टीवर मान्सूनचा जोर पुन्हा वाढल्याने भारतीय हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासाठी पुढील तीन तासांचा अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

नागरिकांसाठी प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र किनारपट्टीवर मान्सूनचा जोर वाढल्याने रायगड जिल्ह्यासाठी पुढील तीन तास अतिमुसळधार पाऊस आणि ताशी ५० ते ६० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. नदी, नाले, धबधबे आणि पूरग्रस्त भागांपासून दूर राहावे. अफवा किंवा सोशल मीडियावरील अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये. केवळ भारतीय हवामान विभाग व जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने केले आहे.

अचानक मोबाईलचा एवढा मोठा आवाज सुरू झाला आणि क्षणभर काहीतरी गंभीर घडल्याचे वाटले. परदेशात अशा प्रकारचे अलर्ट पाहिले होते; मात्र रायगडमध्ये प्रथमच असा अनुभव आला.
- ज्ञानेश्वर जाधव, भाविक, पाली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT