अलिबाग : रायगड जिल्ह्यात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात रायगड पोलिसांनी मागील वर्षभरात धडक कारवाई करीत अंमली पदार्थ तस्करांचे कंबरडे मोडले आहे. पोलिसांनी वर्षभरात अंमली पदार्थ विरोधी 26 कारवाया करत याप्रकरणी 32 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
या कारवाईत पोलिसांनी 123 किलो 768 ग्रॅम वजनाचे सुमारे 94 कोटी 45 लाख 78 हजार 775 रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा तसेच विविध पोलीस ठाण्यांच्या पथकांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवली.
रायगड पर्यटन दृष्ट्या महत्त्वपूर्ण असून, जिल्ह्यात पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. तसेच औद्योगिक जिल्हा म्हणून नावारूपाला येत आहे. त्यामुळे येथे नोकरी निमित्ताने येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अंमली पदार्थ तस्करांना गांजा, चरस, मेफेड्रोन, केटामाईन यांसारख्या अमली पदार्थांना ग्राहक मिळत असल्याचे दिसून येते. अंमली पदार्थ तस्करांवर कारवाईसाठी रायगड पोलिसांनी कारवाई हाती घेतली असून, वर्षभरात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे.
रायगड पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी कारवाई करीत 1 जानेवारी ते 31 डिसेंबर दरम्यान एकूण 26 गुन्हे दाखल केले आहेत. त्यात 32 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कालावधीत रायगड पोलिसांनी 50 किलो 687 ग्रॅम केटामाईन हा अंमली पदार्थ जप्त केला असून, जप्त केटामाईनची किंमत 88 कोटी 92 लाख 25 हजार इतकी आहे. तसेच मागील वर्षभरात पोलिसांनी 4 कोटी 22 लाख 76 हजार रुपये किंमतीचा 4 किलो 76 ग्रॅम एम.डी.,1 कोटी 19 लाख 45 हजारांचा 23 किलो 890 ग्रॅम चरस, 11 लाख 32 हजार 775 रुपयांचा 44 किलो 431 ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ जप्त केला आहे.
दरम्यान, रायगड जिह्याच्या किनारट्टीवर गेली काही वर्षात चरस, गांजा सापडून येण्याच्या घटना घडल्या आहेत. अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन तालुक्यातील किनाऱ्यावर पाकिटे सापडली होती. यामध्ये 1 किलो 100 ग्रॅम वजनाची 185 पाकीटांचा यात समावेश होता. ज्याची किंमत 8 कोटी 25 लाख 11 हजार रुपये होती. या प्रकरणी अलिबाग, रेवदंडा, श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल झाले. पोलीस यंत्रणेसह, केंद्रीय तपास यंत्रणांनी या चरस प्रकरणांचा तपास सुरू केला होता.
त्यानंतर रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील ढेकू येथे एका इलेक्ट्रीक पोल बनविण्याच्या कारखान्यात बेकायदेशीरपणे मेफेड्रॉन अर्थात एमडी हा प्रतिबंधीत अंमलीपदार्थ तयार केला जात असल्याचे समोर आले. पोलीसांनी सुरवातीला धाड टाकून मेफेड्रॉन जप्त करण्यात आले होते.