Raigad Ganeshotsav Pudhari
रायगड

Raigad Ganeshotsav 2026: गणेशोत्सवासाठी रायगड प्रशासन सज्ज! शांतता कमिटीच्या बैठकीत पालकमंत्र्यांच्या महत्त्वाच्या सूचना

सुविधा आणि सुरक्षा उपाययोजना काटेकोरपणे राबवा -पालकमंत्री भरत गोगावले यांचे प्रशासनाला निर्देश

पुढारी वृत्तसेवा

रायगड: गणेशोत्सव पंधरा दिवसांवर येऊन ठेपला आहे. याही वर्षी गणेशभक्तांनी उत्सवाची जय्यत तयारी सुरु केली आहे. त्याचबरोबर जिल्हा प्रशासनही गणेशोत्सवाच्या तयारीला लागले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी गुरुवारी येथील जिल्हा नियोजन भवनात शांतता कमिटीची सभा घेऊन गणेशोत्सव काळात सर्व यंत्रणांनी सज्ज राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

या बैठकीस महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, जिल्हा नियोजन अधिकारी उमेश सुर्यवंशी, तहसिलदार चंद्रसेन पवार आदि उपस्थित होते.

पालकमंत्री भरतशेठ गोगावले म्हणाले, गणेशोत्सव काळात नागरिकांना कोणतीही अडचण भासू नये यासाठी प्रशासनाने पूर्वतयारी पूर्ण ठेवावी. आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक ती व्यवस्था करावी.

गणेशोत्सव काळामध्ये नागरिकांना पुरेशा प्रमाणात वीज, मुबलक प्रमाणात पाणी तसेच वाहतूक व सुरक्षिततेच्यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात याव्यात. गणेशोत्सव, दहीहंडी आणि त्यानंतरचा नवरात्रोत्सव सुरळीत पार पडण्यासाठी सर्वांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांची माहिती नागरिकांना स्पष्टपणे मिळावी, यासाठी योग्य ठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत. इंदापूर, माणगाव, लोणेरे, पोलादपूर आदी भागातील पर्यायी मार्गांचा वापर करताना आवश्यक ठिकाणी वाहतूक मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे.

एखादे वाहन बिघडल्यास ते तातडीने बाजूला काढण्यासाठी क्रेनची व्यवस्था आणि टप्प्याटप्प्याने रुग्णवाहिका उपलब्ध ठेवाव्यात. प्रवाशांसाठी पाणी, चहा-पाणी तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी ठेवावी, असे निर्देशही पालकमंत्री श्री. गोगावले यांनी दिले.

महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे म्हणाल्या, वाहतूक कोंडीच्या ठिकाणी सुविधा केंद्रांची संख्या आवश्यकतेनुसार वाढवावी आणि ज्या ठिकाणी हॉटेल, रेस्टॉरंट किंवा सार्वजनिक शौचालयाची सुविधा उपलब्ध नाही, अशा ठिकाणी तात्पुरती सार्वजनिक शौचालये उपलब्ध करून द्यावीत. दोन-तीन तास वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक व अन्य प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी.

दहीहंडी उत्सवासाठी परवानगी देताना सुरक्षेच्या उपाययोजना, विशेषतः सेफ्टी बेल्टची उपलब्धता ही अनिवार्य अट ठेवावी आणि ती पूर्ण केल्याशिवाय परवानगी देऊ नये. वाहतूक वळविण्यात येणाऱ्या प्रत्येक ठिकाणी पोलीस अथवा सुरक्षा कर्मचारी तैनात करावेत, जेणेकरून रायगडबाहेरील प्रवाशांनाही योग्य मार्गदर्शन मिळेल, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

शांतता समितीच्या सदस्यांचे पुढील तीन दिवसांत पोलीस व्हेरिफिकेशन पूर्ण करून त्यांना आवश्यक ओळखपत्रे देण्यात यावीत. जिल्ह्यातील स्थानिक खासगी रेस्क्यू टीम्सशी जिल्हाधिकारी तसेच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी समन्वय साधावा. आपत्कालीन परिस्थितीत शासकीय यंत्रणा पोहोचण्यापूर्वी या स्थानिक रेस्क्यू टीम्स महत्त्वाची मदत करतात, त्यामुळे सणासुदीच्या काळात त्यांची मदत उपलब्ध होईल, अशा पद्धतीने पूर्वसमन्वय ठेवावा.
- आदिती तटकरे, मंत्री, महिला व बालविकास विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT