अलिबाग ः सुवर्णा दिवेकर
देशातील सर्वात महत्त्वाच्या प्रशासकीय उपक्रमांपैकी एक असलेल्या जनगणनेची प्रक्रिया आता वेग घेऊ लागली आहे. रायगड जिल्ह्यात या डिजिटल जनगणनेची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. देशाच्या इतिहासातील ही 16 वी आणि स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना असून, यावेळी पहिल्यांदाच मोबाईल ॲपच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने माहिती संकलन केले जाणार आहे.
यंदाच्या जनगणनेचे वैशिष्ट्य म्हणजे ती पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार आहे. ‘सेन्सस 2027-एचएलओ’ या मोबाईल ॲपच्या माध्यमातून नागरिकांना प्रथमच स्व-गणना करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना घरबसल्या स्वतःची माहिती नोंदवता येणार असून, पारदर्शकता आणि अचूकता वाढण्यास मदत होणार आहे. महत्वाचे म्हणजे जनगणनेत विचारली जाणारी वय, लिंग, शिक्षण, व्यवसाय आदी माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार असून ती केवळ सांख्यिकीय व विकास नियोजनासाठी वापरली जाईल.
प्रशासनाची व्यापक तयारी
रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात सातत्याने समन्वय बैठका घेण्यात येत असून, विविध विभागांमध्ये जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. प्रत्येक गाव, वाडी आणि शहरातील सर्व घरांचा समावेश होईल, यासाठी सविस्तर नियोजन करण्यात आले आहे. जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजण्यापुरती मर्यादित नसून, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक माहितीचा महत्त्वाचा स्रोत असल्याने तिच्या अचूकतेवर विशेष भर दिला जात आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने होणारी ही जनगणना अधिक वेगवान, अचूक आणि पारदर्शक ठरण्याची अपेक्षा असून, रायगड जिल्हा प्रशासनाने त्यासाठी सर्वतोपरी तयारी केली आहे.
प्रगणकांचे प्रशिक्षण पूर्ण
जनगणनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून प्रगणकांमार्फत माहिती संकलित केली जाणार आहे. रायगड जिल्हयाकरिता 69 क्षेत्रिय प्रशिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. हे प्रशिक्षक पुढे तालुका स्तरावर तसेच नगरपालिका स्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या 5 हजार 98 प्रगणक व 863 पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत. 33 फिल्ड ट्रेनर्सना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. यामुळे डेटा संकलन करताना होणाऱ्या त्रुटी कमी होतील आणि प्रक्रिया अधिक परिणामकारक ठरेल.
दोन टप्प्यात प्रक्रिया
जनगणना प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडणार असून पहिला टप्पा (घरयादी व घरगणना) 1 मे ते 14 जून या कालावधीत होणार आहे. या कालावधीत 1 ते 15 मे पर्यत नागरिकांनाहीं ींीि://ीश.लशर्पीीी.र्सेीं.ळप या संकेतस्थळावरून स्वतः माहिती भरता येणार आहे. तसेच 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक प्रत्यक्ष भेट देऊन मोबाईल ॲपद्वारे माहिती संकलित करतील. प्रत्यक्ष जनगणनेचा दुसरा टप्पा फेब्रुवारी 2027 मध्ये पार पडणार आहे.
कोरोनामुळे विलंब
मुळात 2021 साली होणारी जनगणना कोरोना महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे जवळपास सहा वर्षांचा विलंब झाला. आता 2027 मध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, अद्ययावत आणि विश्वासार्ह माहिती मिळवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
स्व-गणनेला प्राधान्य
जनगणना प्रक्रियेला सुरुवात होण्यापूर्वी 15 दिवसांचा कालावधी नागरिकांना स्वतःची माहिती भरण्यासाठी दिला जाणार आहे. या ‘सेल्फ एन्यूमरेशन’ टप्प्यानंतर 16 मे ते 15 जून दरम्यान प्रगणक घरोघरी भेट देऊन माहितीची पडताळणी व संकलन करतील. त्यामुळे प्रत्येक नागरिकाची नोंद अचूकपणे होईल, याची खात्री प्रशासनाकडून केली जात आहे.
जनगणना ही देशाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे . जनगणनेतून जिल्ह्याचा अद्ययावत आणि अचूक डेटा तयार होणार असून, तो भविष्यातील विकास आराखड्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी स्व-गणना करून आणि प्रगणकांना सहकार्य करून या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा.डॉ. किशन जावळे, जिल्हाधिकारी