cyber fraud pudhari photo
रायगड

Cyber fraud raigad : सायबर गुन्हेगारांच्या ‘म्युल अकाउंट’ रॅकेटवर नवी मुंबई पोलिसांचा मोठा प्रहार

फिनो पेमेंट बँक व इंडियन ओव्हरसीज बँकेतील संशयित खात्यांवर देशभरातील तब्बल २,४५३ सायबर फसवणुकीच्या तक्रारी; अज्ञात खातेदारांविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल

पुढारी वृत्तसेवा

पनवेल, विक्रम बाबर : देशभरातील सायबर फसवणुकीत वापरल्या जाणाऱ्या ‘म्युल अकाउंट’च्या जाळ्याचा पर्दाफाश करण्याच्या दिशेने नवी मुंबई सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. भारतीय सायबर समन्वय केंद्र (I4C) आणि महाराष्ट्र सायबरकडून प्राप्त झालेल्या मनी ट्रेलच्या विश्लेषणातून फिनो पेमेंट बँक व इंडियन ओव्हरसीज बँकेतील संशयित खात्यांचा वापर ऑनलाइन फसवणुकीतील रक्कम स्वीकारण्यासाठी व पुढे वळविण्यासाठी करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी अज्ञात खातेदार व संबंधित वापरकर्त्यांविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपाई प्रशांत चंद्रकांत कारखेले यांनी दिलेल्या सरकारतर्फे फिर्यादीनुसार, फिनो पेमेंट बँकेतील तीन संशयित खात्यांवर देशभरातील विविध राज्यांमधून तब्बल अनुक्रमे १५४, १८७ आणि १८०९ अशा एकूण २,१५० तक्रारींचा संदर्भ आढळून आला आहे. एनसीआरपी (NCRP) पोर्टलवरील मनी ट्रेलच्या तपासातून या खात्यांमध्ये सायबर फसवणुकीची रक्कम जमा झाल्यानंतर ती पुढील खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आल्याचे किंवा काढून घेण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. हा व्यवहार १२ फेब्रुवारी २०२४ ते १७ मार्च २०२६ या कालावधीत झाल्याचे तपासात नमूद करण्यात आले आहे.

दुसऱ्या प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता सुरेश पवार यांनी दिलेल्या सरकारतर्फे फिर्यादीनुसार, वाशी येथील इंडियन ओव्हरसीज बँकेतील चार संशयित खात्यांवर देशभरातून एकूण ३०३ सायबर फसवणुकीच्या तक्रारी नोंद झाल्या आहेत. या खात्यांचाही वापर फसवणुकीची रक्कम स्वीकारण्यासाठी, ती पुढे वर्ग करण्यासाठी अथवा रोख स्वरूपात काढण्यासाठी करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या खात्यांवरील व्यवहार नोव्हेंबर २०२५ ते मे २०२६ या कालावधीत झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

सायबर गुन्हेगार नागरिकांना शेअर मार्केटमध्ये मोठा परतावा, पार्टटाईम जॉब, डिजिटल अटक, गुंतवणूक योजना तसेच इतर आमिषे दाखवून फसवतात. त्यानंतर फसवणुकीची रक्कम विविध ‘म्युल अकाउंट’मध्ये जमा करून ती पुढील खात्यांमध्ये वळवली जाते किंवा एटीएम व चेकद्वारे काढली जाते. भारतीय सायबर समन्वय केंद्राच्या एनसीआरपी पोर्टलवरील माहिती आणि मनी ट्रेलच्या आधारे ही संशयित खाती ओळखण्यात आली आहेत.

या दोन्ही प्रकरणांमध्ये अज्ञात खातेदार व संबंधित वापरकर्त्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४), ३१७(२) आणि ३(५) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून सायबर पोलिसांकडून संबंधित खातेदार, व्यवहारांची साखळी आणि या रॅकेटमागील मुख्य सूत्रधारांचा शोध सुरू आहे.

खालील विविध बँक खात्यावर प्राप्त झालेल्या तक्रारी

1- 3218000246- FIN00000001--आठवा मजला, टीटीसी माइंडस्पेस, जुईनगर, प्लॉट नं Gen/2/1/f, टॉवर 1, औद्योगिक क्षेत्र, शिरवणे, नवी मुंबई ४००७०५ ( १५४ ) तक्रारी प्राप्त

२-३२१८०००६१८-फिनो००००००१- ( १८७ ) तक्रारी प्राप्त

३-३२१८०००३३६-फिनो००००००१- ( १८०९ ) तक्रारी प्राप्त

059601000077458- IOBA0000596-प्लॉट नं. 4/4, सेक्टर 5, ईएसआय हॉस्पिटल जवळ, वाशी, नवी मुंबई -४००७०५

११५-०५९६०१००००७७४६३

९६-०५९६०१००००७७४६७

३६-०५९६०१००००७७४७३-५६

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT