Cyber fraud Panvel : गॅस कनेक्शन बंद होण्‍याची भीती दाखवत ज्येष्ठ नागरिकाची 5.28 लाखांची ऑनलाइन फसवणूक!

MGLच्या बनावट मेसेजचा सापळा; बिल अपडेटच्या नावाखाली सायबर भामट्यांनी साधला डाव
Cyber fraud Panvel
Cyber fraud PanvelFile Photo.
Published on
Updated on

Cyber fraud Panvel

पनवेल, विक्रम बाबर : महानगर गॅस लिमिटेड (MGL) कंपनीच्या नावाचा गैरवापर करून ग्राहकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या सायबर भामट्यांचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. खांदा कॉलनी येथे राहणारे सुभाष बाबाराव तारे (वय ७०) यांना MGLच्या नावाने बनावट संदेश पाठवून तब्बल ५ लाख २८ हजार ३६४ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाईलवर आला मेसेज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष तारे यांच्या मोबाईलवर "Dear Pipeline MGL Gas User" अशा मजकुराचा मेसेज (संदेश) आला होता. या संदेशात मागील महिन्याचे मीटर रीडिंग अपडेट झाले नसल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच, रात्री ९.३० वाजता गॅस कनेक्शन बंद करण्यात येईल, अशी भीती निर्माण करून "बिल अपडेट ऑफिसर" म्हणून एका व्यक्तीचा मोबाईल क्रमांक देण्यात आला होता. तातडीने संपर्क साधून बिल अपडेट करण्याचे आवाहनही संदेशात करण्यात आले होते.

Cyber fraud Panvel
Thane Cyber Fraud: एका क्लिकचा फटका, ४४ लाखांचा झटका!

बिल अपडेटच्या नावाखाली सायबर भामट्यांनी साधला डाव

संदेश खरा असल्याचा समज करून सुभाष तारे यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर समोरच्या व्यक्तीने बिल अपडेट करण्याच्या प्रक्रियेचे मार्गदर्शन करत केवळ १३ रुपये भरण्यास सांगितले. व्यवहार सुरू असतानाच तारे यांच्या लक्षात काहीतरी संशयास्पद घडत असल्याची जाणीव झाली. त्यामुळे त्यांनी तातडीने मोबाईलवरील प्रक्रिया थांबवून फोन बंद केला. मात्र, तोपर्यंत सायबर भामट्यांनी त्यांच्या बँक खात्यात प्रवेश मिळवत ५ लाख २८ हजार ३६४ इतकी मोठी रक्कम परस्पर काढून घेतली होती. काही वेळाने खात्याची पडताळणी केली असता फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

Cyber fraud Panvel
Cyber Fraud Auto FIR System: सायबर फसवणुकीला लगाम! ५ लाखांवरील गुन्ह्यांना आता थेट ऑटो एफआयआर; तपासाला मिळणार वेग

सायबर भामट्यांविरोधात तक्रार दाखल

घडलेल्या प्रकारानंतर तारे यांनी तातडीने केंद्र सरकारच्या १९३० सायबर हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार नोंदवली. त्यानंतर त्यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात सायबर भामट्यांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी संबंधित टोळीविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील मोबाईल क्रमांक, व्यवहाराची माहिती आणि संबंधित बँक खात्यांचा तपास केला जात आहे.

Cyber fraud Panvel
Cyber Fraud Case | व्हॉटस्ॲ‌प हॅक करून सीईओच्या नावाने ८० लाखांची फसवणूक

बोगस मेसेजपासून सावध राहण्‍याचे पोलिसांचे आवाहन

सायबर पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या संदेशांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. गॅस, वीज, बँक किंवा अन्य कोणत्याही संस्थेच्या नावाने येणाऱ्या संदेशांतील मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्यापूर्वी संबंधित कंपनीच्या अधिकृत ग्राहक सेवा क्रमांकावर खात्री करून घ्यावी. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, मोबाईलवर ॲप डाउनलोड करू नये किंवा ओटीपी, यूपीआय पिन अथवा बँकेची गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news