Farmer Loan waiver
अलिबाग : शेतीसाठी रायगड जिल्ह्यातील २ हजार ९३९ शेतकऱ्यांनी शेती कर्ज घेतले आहेत. वर्षभरात १८ कोटी १६ लाख रुपये कर्ज थकीत आहे. महायुती सरकारने निवडणुकीच्या वचननाम्यात शेतकऱ्यांचे कर्ज माफिचे आश्वासन दिले होते. निवडणूक होऊन महायुती सरकार स्थापन झाले आणि अर्थसंकल्पही जाहीर झाला. मात्र महायुतीने शेतकरी कर्जमाफी जाहीर केली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्याची विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रत्येक पक्षाने आपले जाहीरनामे जाहीर केले. महायुतीने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी करू अशी घोषणा केली होती. मात्र निवडणूक होऊन महायुती सरकार स्थापन झाले तरी कर्जमाफी जाहीर केलेली नाही आहे.
रायगड जिल्ह्यात बँकेनी शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप केले आहे. जिल्ह्यातील २ हजार ९३९ शेतकऱ्यांनी करोडो रुपयाचे पीक कर्ज घेतले आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत १८ कोटी १६ लाखाचे कर्ज शेतकऱ्यांचे थकीत आहे.
२०२४ हे वर्ष निवडणुकीचे होते. लोकसभा, विधानसभा निवडणुका या वर्षात झाल्या. निवडणुका असल्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या घोषणा सत्ताधारी आणि विरोधक पक्षांनी केल्या होत्या. मात्र सत्तेत आल्यानंतर शेतकरी कर्जमाफी घोषणा हवेतच विरली गेली आहे. सरकार कर्जमाफी करेल या आशेवर कर्ज घेणारे शेतकरी राहिल्यामुळे वर्षभरापासून परतफेड लटकली आहे.
शेती करणे हल्ली जिकरीचे झाले आहे. नैसर्गिक आपत्ती, मुसळधार पावसाने शेतीचे नुकसान होत आहे. शेती करण्यासाठी कर्ज घेतले आहे. मात्र नैसर्गिक आपत्तीने पिकाचे नुकसान असल्याने आर्थिक अडचणीत सापडलो आहे. त्यामुळे कर्ज फेडणे जमले नाही. निवडणुकीपूर्वी कर्जमाफी घोषणा केली होती. मात्र आमच्या तोंडाला शासनाने पाने पुसली आहेत.वैभव पाटील, शेतकरी..
रायगड जिल्ह्यात २ हजार ९३९ शेतकऱ्यांनी विविध बँकांमार्फत कोटी रुपयांचे पीक कर्ज घेतले आहे. यातील अनेकांनी कर्ज भरले आहे. तरीही १८ कोटी १६ लाख रुपये कर्ज थकीत आहे.विजय कुलकर्णी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, रायगड