Central Railway Matheran station festival
रोहे : मध्य रेल्वेने शनिवारी (दि. १३) माथेरान स्थानक महोत्सवाचे आयोजन केले. रेल्वे बोर्डाच्या निर्देशानुसार आयोजित या महोत्सवात माथेरान लाईट रेल्वेचा ११८ वर्षांचा ऐतिहासिक वारसा सादर करण्यात आला.
माथेरान स्थानक परिसरात आयोजित केलेल्या भव्य प्रदर्शनात रेल्वेच्या समृद्ध इतिहासाशी संबंधित विविध वस्तूंचे आणि माहितीचे प्रदर्शन करण्यात आले. भौतिक आणि डिजिटल माध्यमांचा वापर करून सादर केलेल्या या प्रदर्शनामुळे अभ्यागतांना माथेरान लाईट रेल्वेच्या इतिहासाची आणि त्याच्या परंपरेची सखोल माहिती मिळाली.
स्टीम लोको 794B, ४-चाकी बोगी फ्लॅट रेल (BFR) वॅगन, दार्जिलिंग हिमालयन रेल्वेची नॅरो गेज बोगी, तसेच माथेरान लाइट रेल्वेची बोगी.
जुन्या काळातील स्थानक कर्मचाऱ्यांचे बॅज, पट्टे, हातघंटी, लाकडी पेटी, मोजमाप काटे, सिग्नलिंग दिवा, तेलाचे कॅन, पाणी देण्यासाठी वापरले जाणारे ग्लास आणि काचेचे निगेटिव्ह यांसारख्या वारसा वस्तूंचे देखील प्रदर्शन करण्यात आले.
प्रदर्शनाच्या ठिकाणी व्हीआर ऑक्युलस चष्म्यांद्वारे नेरळ-माथेरान मार्गावर ३६० अंशात व्हर्च्युअल सफारीसाठी विशेष सुविधा देण्यात आली. तसेच, नेरळ–माथेरान मार्गाशी संबंधित डायऱ्या, कॉफी मग्स, टी-शर्ट्स आणि की-चेन यांसारखी स्मृतिचिन्हे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली.
हे प्रदर्शन सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत खुले होते आणि त्याला प्रवासी, पर्यटक व स्थानिक रहिवाशांपासून २०० हून अधिक अभ्यागतांनी उत्साही प्रतिसाद दिला.
नेरळ-माथेरान रेल्वे मार्गाची उभारणी १९०४ मध्ये सुरू झाली आणि १९०७ मध्ये हा नॅरो गेज मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या मार्गावर मध्य रेल्वेने रेल्वे सेवा सुरू केली असून, पावसाळ्यात हा मार्ग बंद ठेवला जातो. तथापि, २९ सप्टेंबर २०१२ पासून अमन लॉज-माथेरान दरम्यान शटल सेवा पावसाळ्यातही सुरू केली गेली आहे.
सध्या मध्य रेल्वेने दररोज ४ गाड्या नेरळ-माथेरान मार्गावर चालविल्या जातात, तर अमन लॉज-माथेरान मार्गावर एकूण १६ सेवा सुरू आहेत, त्यापैकी १२ सेवा दररोज आणि ४ विशेष सेवा शनिवार व रविवारसाठी असतात.
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी व आरामदायिक प्रवासासाठी मध्य रेल्वेने पायाभूत सुविधा कामे हाती घेतली आहेत. नोव्हेंबर २०२५ मध्ये, या मार्गावर एकूण ३८,१६४ प्रवाशांनी प्रवास केला, ज्यातून मध्य रेल्वेला २९.१८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
मध्य रेल्वेने या मार्गावर नव्याने पुनर्रचित डबे चालवले आहेत, ज्यामध्ये विंटेज रंगसंगती, लाकडी फिनिशिंग, नवीन तपकिरी रंगाची रेक्सीन लेदर आसनव्यवस्था आणि प्रथम श्रेणीतील डब्यांमध्ये सामान ठेवण्याची सुविधा दिली आहे.
माथेरानच्या निसर्गसौंदर्यातून प्रवास करत असताना प्रवाशांना एक अविस्मरणीय अनुभव मिळतो. त्यामुळे हे स्थान एक प्रमुख पर्यटनस्थळ बनले आहे, जे पर्यटकांना निसर्गाच्या सौंदर्यात रमण्याचा थरारक अनुभव देतो. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळून रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.