

माथेरान : मिलिंद कदम
माथेरानची मिनी ट्रेन महाराष्ट्राचे भूषण असून महाराष्ट्रामधील एकमेव मिनी ट्रेन असल्याने येथे या सफरीचा आनंद घेण्याकरिता लाखो पर्यटक भेट देत असतात परंतु नेरळ माथेरान अपुऱ्या फेऱ्यांमुळे त्यांचा भ्रमनिरास होत आहे. रेल्वे प्रशासनही या फेऱ्या वाढाव्या याकरिता उत्साही दिसत नाही. तोट्याचे कारण देत नेहमीच या हिल ट्रेनकडे फक्त कर्मचारी वर्गामुळे दुर्लक्ष होत असल्याच्या भावना माथेरानमधील स्थानिक नागरिकांच्या आहेत.
नेरळ-माथेरान मिनी ट्रेन (टॉय ट्रेन) ही माथेरानला जोडणारी एक ऐतिहासिक आणि लोकप्रिय नॅरो-गेज रेल्वे आहे, जी नेरळ जंक्शनवरून सुटते. पावसाळ्यात (जून ते ऑक्टोबर) बंद राहते आणि नोव्हेंबरमध्ये पुन्हा सुरू होते, ज्यामुळे पर्यटकांना घनदाट हिरवीगार निसर्गरम्य सह्याद्रीची वाट चढून प्रदूषणमुक्त हिल स्टेशनचा अनुभव मिळतो. ही ट्रेन सुमारे 21 किमीचा प्रवास 2 तास 45 मिनिटांत पूर्ण करते आणि माथेरानमधील अनेक सुंदर व्ह्यू पॉइंट्स पाहण्यासाठी उत्तम साधन आहे.
सध्या नेरळ येथून 8:10 व सकाळी 10:30 वाजता मिनी ट्रेन सुटते, परंतु या व्यतिरिक्त अजूनही नेरळ-माथेरान मार्गावरती फेऱ्या असाव्यात अशी पर्यटकांची मागणी आहे. पूर्वी माथेरानमध्ये नियमितपणे पाच फेऱ्या सुरू असायच्या ज्यामध्ये एक मालगाडी व एक वस्तीची गाडी ही असायची. केव्हा केव्हा तर वस्तीच्या दोन गाड्या येत असत परंतु त्यावेळी रेल्वे कर्मचारी माथेरानमध्ये राहत असे, त्यामुळे या सर्व सेवेकरिता कर्मचाऱ्यांची कमी नव्हती परंतु आता माथेरानमध्ये एकही कर्मचारी राहत नाही.
संध्याकाळी सहा वाजताची शेवटची शटल येताच सर्व जणांना माथेरान बाहेर घर असल्याने जाण्याची घाई असते. त्यामुळेच रात्री वस्तीच्या गाडीकरिता एकही कर्मचारी आग्रही नाही परंतु ही गाडी माथेरानचे खास आकर्षण होते, त्यामुळेच ही गाडी पुन्हा पूर्ववत सुरू व्हावी याकरिता माथेरानकर आग्रही आहेत. मिनी ट्रेनच्या ताफ्यामध्ये आता इंजिनची संख्या वाढलेली आहे त्यामुळे ही ट्रेन सुरू करण्याकरिता सर्व काही अनुकूल असतानाही फक्त कर्मचाऱ्यांच्या अनास्तेमुळे नेरळ-माथेरान वस्तीची ट्रेन सुरू केली जात नसल्याची तक्रार माथेरानकर करीत आहेत व त्याकडे वरिष्ठ अधिकारीही सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहेत, असे सांगितले जाते.
माथेरानची महाराणी टॉय ट्रेन ही व्हेंटिलेटरवर असून शेवटची घटका मोजत आहे. त्यात सुधारणा झाली नाही तर माथेरानला पर्यटक न येता ते इतर ठिकाणी फिरण्यासाठी जातील याची समस्त माथेरानकरांनी दखल घेतली नाही तर आपल्या भावी पिढीचे भवितव्य धोक्यात येईल, याची दाट शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा माथेरानमध्ये पर्यटन वाढीसाठी ठोस निर्णय घेतले पाहिजेत.
जनार्दन पार्टे, सामाजिक कार्यकर्ते
माथेरान मिनी ट्रेनची सफर पहिल्यांदा शालेय सहलीमध्ये केली गेली होती, त्याच्या आठवणी आजही ताजा आहेत व आता मुलांबरोबर या गाडीने सफर करताना हा प्रवास वेळखाऊ वाटू लागला आहे. निसर्गाची सफर करताना नेरळ- माथेरान वेळ कमी करताना फेऱ्या वाढल्यास ही सफर नक्कीच अविस्मरणीय आहे.
संजोग जाधव, पर्यटक, वसई