Girish Mahajan Pudhari
रायगड

Raigad Beach Safety: सागरी किनारी लाईफगार्ड वाढवणार; मंत्री गिरीष महाजन यांच्या आदेशानंतर प्रशासन कार्यरत

ग्रामपंचायत, आपत्ती निवारण यंत्रणा आणि पोलिसांच्या माध्यमातून सुरक्षा व्यवस्था; दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजनांना वेग

पुढारी वृत्तसेवा

रायगड: गुरुवारी दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर सहलीला आलेल्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडल्या नंतर राज्याचे आपत्ती निवारण मंत्री गिरीष महाजन यांनीच या घटनेचे गांभिर्य विचारात घेवून तत्काळ रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांना या घटनेस जबाबदार असलेल्यावर कारवाई करण्याचे आदेश दिल्यावर रायगड जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले.

जिल्ह्यातील सर्व समुद्र किनाऱ्यांवर सुरक्षात्मक उपाययोजना करण्याकरिता संबंधीत समुद्र किनारा ज्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात येतो ती ग्रामपंचायत, जिल्ह्याची आपत्ती निवारण यंत्रणा आणि स्थानिक पोलिस यांच्या माध्यमातून लाईफगार्डची नियूक्ती करण्यात येणार आहे. दरम्यान समुद्र किनाऱ्यांवर पुर्वीपासून पोलिस चौक्या आहेत.

त्यातील पोलिस आणि स्थानिक जिवरक्षक यांनी या पूर्वीही आपत्कालीन परिस्थितीत बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवण्याचे काम केले असल्याची माहिती रायगड जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, गुरुवारी रात्री सर्व कायदेशीर व वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करून आठही विद्यार्थ्यांचे पार्थिव त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. शुक्रवारी आळंदी येथे अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर आता पोलीस तपासाचा पुढील टप्पा सुरू झाला आहे.

शनिवारी अधिकारी नातेवाकांची भेट घेऊन त्यांचे अधिकृत जबाब नोंदवतील. या दुर्घटनेला नातेवाईकांनी कोणाला जबाबदार धरले आहे किंवा यात कोणाचा निष्काळजीपणा समोर आला आहे, हे या जबाबांवरून स्पष्ट होईल.

नातेवाईकांच्या तक्रारी व जबाबाच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई व पोलीस तपासाची दिशा निश्चित केली जाईल, असे रायगड जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान दिवेआगरच नव्हे तर रायगड जिल्ह्यातील सर्व समुद्र किनारी स्थानिक ग्रामपंचायत, आपत्ती निवारण यंत्रणा व पोलिस यांच्या माध्यमातून लाईफगार्ड तैनात करण्यात येत आहेत, सर्व समुद्र किनारी पोलिस तैनात असलल्याचे अपर जिल्हा पोलिस अधिक्षक शिवथरे यांनी अखेरीस सांगीतले.

दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर बुडून मृत्यू झालेल्या आठही विद्यार्थ्यांचे मृतदेह गुरुवारी रात्री उशिरा आळंदी येथे त्यांच्या मूळ गावी सुखरूप पाठवण्यात आले असून, शुक्रवारी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान काळ रात्री आपत्ती निवारण मंत्री गिरिष महाजन यांनी रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्याशी फोन वरुन संपर्क करुन या घटनेस विद्यार्थींची सहल घेवून येणारे शिक्षक जबाबदार आहेत का या अनूशंगाने तपास करण्यास सांगीतले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी जावळे यांनी रायगड जिल्हा पोलिस अधिक्षक आंचल दलाल यांना या बाबत निर्देश दिले होते.

त्यानुसार गुरुवारी रात्री सहली बरोबर आलेल्या एका शिक्षकाला थांबवून पोलिसांनी चौकशी करुन जबाबा घेतला असल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती निवारण प्रधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा रायगडचे निवासी उप जिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी दैनिक पुढारी शी बोलताना दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT