Pudhari
रायगड

Raigad Sub Registrar Strike | रवींद्र कोळी हल्ला प्रकरणाचे अलिबागेत पडसाद : मुद्रांक कार्यालय कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन; कामकाज ठप्प

पुण्यातील सह दुय्यम निबंधक रवींद्र कोळी यांच्यावर हल्ला

पुढारी वृत्तसेवा

Raigad Alibag Sub Registrar Office Strike

अलिबाग : पुण्यातील सह दुय्यम निबंधक रवींद्र कोळी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद अलिबागमध्ये उमटले. रायगड जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोमवारी दिवसभर कामबंद आंदोलन करत शासनाविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. आजच्या आंदोलनामुळे या कार्यालयातील कामकाज ठप्प झाले होते.

अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून शासनाच्या नावाने निवेदन सादर केले. रवींद्र कोळी यांच्यावर हल्ला करणाऱ्या तिन्ही आरोपींवर अजामीनपात्र कलमे लावून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) अंतर्गत कारवाई करण्यात यावी व त्यांना तात्काळ अटक करावी, अशी प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली.

तसेच, या प्रकरणातील तपास अधिकाऱ्याने आरोपींना मदत केल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करावे व आरोपी आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांमधील संबंधांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.

राज्यातील सर्व नोंदणी व मुद्रांक कार्यालयांना महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महामंडळामार्फत (एमएसएफ) सुरक्षा उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच सर्व कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही आणि अन्य सुरक्षा यंत्रणा तातडीने बसविण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली.

याशिवाय, पक्षकारांच्या वैयक्तिक वादातून विभागातील कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी बंधनकारक करावी, नोंदणी प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांची अधिकृत तपशीलवार यादी जाहीर करावी, मंजूर आकृतिबंधानुसार रिक्त पदे तातडीने भरावीत, 'एक जिल्हा–एक नोंदणी' धोरणाचा पुनर्विचार करावा आणि राज्यातील सर्व नोंदणी कार्यालयांचे कामकाजाचे दिवस व वेळा समान कराव्यात, अशा विविध मागण्यांचाही निवेदनात समावेश होता.

दरम्यान, या आंदोलनामुळे अलिबागमधील नोंदणी व मुद्रांक कार्यालयाचे कामकाज दिवसभर ठप्प राहिले. शासनाने मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा कर्मचारी संघटनेने दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT