

रायगड: रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग पासून सुमारे २३ किलोमीटर अंतरावर असलेल्या कुसुंबळे येथील प्राचीन शिवमंदिराच्या जोत्यावर कोरलेला एक ब्रिटिशकालीन शिलालेख नुकताच प्रकाशात आला आहे.
इतिहास संशोधनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा हा शिलालेख कोकण इतिहास परिषदेचे रायगड जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. अंजय धनावडे यांनी शोधून त्याचे यशस्वी वाचन केले आहे.
शके १८२० (इ.स. १८९८) मधील या चार ओळींच्या शिलालेखावरून ब्रिटिश राजवटीच्या काळात अलिबाग हे जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र असतानाही ग्रामीण भागातील धार्मिक संस्था, मठपरंपरा आणि मंदिर व्यवस्थापन किती सक्रिय होते, याचा दुर्मीळ अभिलेखीय पुरावा या निमीत्ताने समोर आला आहे.
या शिलालेखामुळे कोकणातील शैव परंपरा, मंदिर व्यवस्थापन आणि दशनामी गोसावी परंपरेतील ‘पुरी’ संप्रदायाच्या कार्याचा एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक दस्तऐवज प्रथमच प्रकाशात आला असल्याचा दावा कोकण इतिहास परिषदेचे रायगड जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. अंजय धनावडे यांनी केला आहे.
या शिलालेखाचा सखोल अन्वयार्थ मांडताना प्रा. डॉ. अंजय धनावडे यांनी सांगितले की,येथे उल्लेख झालेली बुधपुरी, समशेरपुरी, शंकरपुरी, चिदापुरी, देऊपुरी आणि मंगळपुरी ही नावे दशनामी गोसावी परंपरेतील 'पुरी' शाखेशी संबंधित असल्याची दाट शक्यता आहे.
त्यामुळे हा शिलालेख केवळ मंदिराच्या जीर्णोद्धाराची नोंद नसून कोकणातील पुरी संप्रदायाचे अस्तित्व, त्यांची गुरु-शिष्य परंपरा आणि मंदिर व्यवस्थापनातील त्यांचे योगदान अधोरेखित करणारा अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तऐवज ठरतो.
कोकणातील पुरी परंपरेचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत मागे जातो. शिवकाळात प्रसिद्ध तांत्रिक राज्याभिषेक करणारे ‘निश्चलपुरी’ गोसावी यांचा उल्लेख इतिहासात ठळकपणे आढळतो. त्यामुळे दशनामी संप्रदायातील पुरी परंपरेचे कोकणातील अस्तित्व किमान सतराव्या शतकापासून असल्याचे स्पष्ट होते.
कुसुंबळे येथील इ.स. १८९८ मधील हा शिलालेख त्या ऐतिहासिक परंपरेचे एकोणिसाव्या शतकातील सातत्य दर्शवणारा महत्त्वाचा पुरावा असल्याचे डॉ.धनावडे यांनी सांगीतले. तथापि, शिलालेखातील पुरी साधूंचा आणि शिवकालीन निश्चलपुरी यांचा थेट संबंध असल्याचा कोणताही पुरावा सध्या उपलब्ध नसला, तरी त्या संबंधांचा शोध घेण्याच्या दृष्टीने हा शिलालेख भविष्यात महत्त्वपूर्ण दुवा ठरू शकतो, असेही प्रा. डॉ. धनावडे यांनी स्पष्ट केले.
कोकणात शैव परंपरेच्या जतनात पुरी संप्रदायाचे मोठे योगदान राहिले आहे. मंदिरांची देखभाल, जीर्णोद्धार, धार्मिक विधी आणि मठसंस्थांचे कार्य या माध्यमातून या संप्रदायाने दीर्घकाळ धार्मिक परंपरा जोपासली. विशेष म्हणजे, एकाच शिलालेखात सलग अनेक "पुरी" साधूंची नावे आढळणे ही अत्यंत दुर्मीळ बाब मानली जाते.
त्यामुळे कोकणातील पुरी संप्रदायाची वंशपरंपरा, धार्मिक केंद्रे आणि स्थानिक समाजाशी असलेले संबंध याविषयी पुढील संशोधनासाठी या शिलालेखामुळे नवी दिशा मिळणार असल्याचे डॉ.धनावडे यांनी म्हटले आहे.
शिलालेखात नेमका काय आहे मजकूर?
प्रा. डॉ. धनावडे यांनी केलेल्या वाचनानुसार, या शिलालेखात स्पष्टपणे नोंदवले आहे की – "बुधपुरी, समशेरपुरी, शंकरपुरी व चिदापुरी चे मंदिर होते. त्याचा जीर्णोद्धार नातू देऊपुरी, गुरु मंगळपुरी..." तसेच पुढे "गौरशिवचे पु. पांडू बामणा..." अशीही एक महत्त्वपूर्ण नोंद कोरलेली आढळते. शिलालेखाच्या शेवटी "शके १८२०, विलंबी नाम संवत्सरे" अशी स्पष्ट कालनोंद आहे, ज्यावरून या मंदिराचा जीर्णोद्धार इ.स. १८९८ मध्ये झाल्याचे सिद्ध होते.