भारत चोगले
श्रीवर्धन : पुण्याहून श्रीवर्धनमध्ये पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या वाहनाने शहरातील एका दुचाकीस्वाराला उडविले. यामध्ये तो जागीच ठार झाला. ही दुर्घटना राऊत राऊत हायस्कूलसमोरील समुद्राकडे जाणार्या रस्त्यावर सायंकाळी घडली. या अपघातानंतर शहरातील वातावरण तणावाचे बनले असून,बेभानपणे वाहने चालविणार्या पर्यटकांबाबत कमालीचा संताप निर्माण झाला आहे.
श्रीवर्धनमधील परवेज हमदुले हे मोटारसायकलवरून घरी जात होत. पुण्याहून आलेले ?(एमएच 12 व्हीडब्ल्यू 8055 ) ही पर्यटकांची गाडी शहरातून समुद्रकिनार्याकडे जात होते. यावेळी चारचाकी व दुचाकीचा भीषण अपघात झाला. धडकेची तीव्रता इतकी होती की दुचाकी रस्त्यावर दूर फेकली गेली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत जखमी परवेज हमदुले यांना उपजिल्हा रुग्णालय, श्रीवर्धन येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर रुग्णालय परिसरात शेकडो नागरिकांची गर्दी जमली होती. परिस्थिती चिघळू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून माणगाव, म्हसळा व दिघीसागरी येथून अतिरिक्त पोलीस फौज मागवण्यात आली होती. या प्रकरणाचा उपविभागीय अधिकारी सविता गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमेश पाटील पुढील तपास करत आहेत. संबंधित वाहन, अपघाताची कारणे व इतर बाबींची कायदेशीर चौकशी सुरू आहे.रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद करण्याचे काम सुरू होते.या गाडीतून पाच, सहाजण प्रवास करत होते.त्या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जमाव मोठ्या प्रमाणात जमल्याने पोलिसांनी तातडीने या सर्वांना सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस ठाण्यात आणले.त्या सर्वांची तपासणी सुरु आहे.
वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन
या मार्गावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वाहतूक असून वेगाने वाहन चालवणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची नागरिकांमधून तीव्र चिंता व्यक्त होत आहे. काही नागरिकांनी दारूच्या नशेत सुसाट वाहन चालवणार्या पर्यटकांवर वेळीच कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अशा प्रकारांवर श्रीवर्धन पोलीस ठाण्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अन्यथा भविष्यात अशा दुर्दैवी घटनांना पुन्हा सामोरे जावे लागेल, अशी भावना व्यक्त होत आहे.