

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे बुधवारी (दि.17) संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मुंबईहून गणपतीपुळे येथे जाणाऱ्या चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य एक प्रवासी जखमी झाला आहे.
अपघातग्रस्त वाहन (क्र. एमएच 04 जेव्ही 7198) हे भरधाव वेगात येत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. वाहनाने रस्त्यालगत असलेले साईड गार्ड तोडून रस्त्याबाहेर घसरण घेतली. अपघात इतका भीषण होता की गाडीचा अर्धा भाग रस्त्याखाली गेला तर पुढील भाग रस्त्यावरच अडकून राहिला.
अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमी प्रवाशाला प्राथमिक उपचारांसाठी नजीकच्या तसेच अपघातात मृत व्यक्तीला रुग्ण वाहिकेने रुग्णालयात आणले. इतरांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. मृत चालकाचे नाव वय अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनास्थळी पोलिसांकडून पंचनामा करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती. अपघाताचे नेमके कारण तपासले जात आहे. सुसाट वेग आणि वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक शक्यता घटनास्थळी उपस्थितांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेमुळे काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे वाहतूक सुरळीत करण्यात आली. पुढील तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत.