

नाशिक : नाशिकच्या हनुमान नगर चौफुलीवर अचानक झालेल्या तिहेरी अपघातात स्विफ्ट डिझायर कार दाबली गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातामुळे काही काळ परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून कार चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.
नाशिक शहरातील हनुमान नगर चौफुली येथे सोमवारी रात्री ९ वाजता तिहेरी अपघात घडला. प्राथमिक माहितीनुसार, म्हसरूळ परिसराकडून मुंबई,आग्रा महामार्गाकडे जात असताना चौफुलीवर अचानक एका ट्रॅव्हल्स बसमध्ये बिघाड झाला. त्यामुळे बस समोरील मालवाहू ट्रकवर जाऊन आदळली. या धडकेचा जोर इतका होता की ट्रकने पुढे उभी असलेल्या स्विफ्ट डिझायर कारला जोरदार धडक दिली.
या अपघातात स्विफ्ट डिझायर क्र. एम.एच. 15 एफ.एफ. 6190 या कारच्या पुढील बोनटसह मागील डिक्कीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच मालवाहू ट्रक (क्र. एम.एच. 12 एस.एक्स. 2770 व ट्रॅव्हल्स बस क्र. एम.एच. 43 जे. 5109 यांनाही धडक बसून ट्रॅव्हल्स बसची समोरील काच फुटली.
अपघाताचा मोठा आवाज ऐकून नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली, त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली. घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलीस ठाणे व वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. टोईंग-व्हॅनच्या मदतीने ट्रकमध्ये अडकलेली स्विफ्ट डिझायर बाहेर काढण्यात आली.तीनही वाहने पुढील कारवाईसाठी आडगाव पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली असून या प्रकरणी पुढील तपास आडगाव पोलिसांच्या निगराणीत सुरू आहे.