Khalapur Road Issue Pudhari
रायगड

Khalapur Road Issue: स्वातंत्र्य मिळूनही आदिवासींची परवड सुरूच; गर्भवती महिलेला झोळीतून न्यावे लागले दवाखान्यात

मोरबे धरणाजवळच्या दुर्गम वाड्या आजही रस्ते आणि विजेविना अंधारात

पुढारी वृत्तसेवा

प्रशांत गोपाळे

खोपोली: एकीकडे केंद्र आणि राज्य सरकार 'सबका साथ, सबका विकास'चे नारे देत विकासाच्या मोठ्या गप्पा मारत असताना, दुसरीकडे मुंबईपासून अवघ्या ८० किमी अंतरावर एक अत्यंत लाजिरवाणी आणि भीषण वास्तव समोर आणणारी घटना घडली आहे.

खालापूर तालुक्यातील चौक परिसरातील अतिदुर्गम भागात असलेल्या उंबरणेवाडी येथील एका गर्भवती महिलेला रस्ता नसल्यामुळे चादरीच्या झोळीत टाकून ६ किमी डोंगर-दऱ्यांतून दवाखान्यात न्यावे लागल्याची संतापजनक घटना घडली आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

उंबरणे गावापासून चौक शहरात जाण्यासाठी फक्त एक अरुंद पायवाट आहे. त्यातच सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ही पायवाटही वाहून गेली असून, तिथे फक्त मोठे दगड-धोंडे शिल्लक राहिले आहेत.

याच दगड-धोंड्यांच्या आणि ओढ्या-नाल्यांच्या रस्त्यातून वाट काढत उंबरणेवाडीतील अनंता पारधी यांच्या गरोदर पत्नीला प्रसूतीसाठी चौकमधील दवाखान्यात आणण्यात आले. भर पावसात, डोक्यावर छत्र्या धरून आणि खांद्यावर झोळी पेलताना ग्रामस्थांची मोठी दमछाक झाली.

प्रवासादरम्यान महिलेला होणाऱ्या असह्य वेदना आणि तिच्या किंकाळ्या ऐकून उपस्थित ग्रामस्थांचे डोळे पाणावले होते.तमाम अडचणी, निसर्गाचे आव्हान आणि सर्वात दुर्दैवी शासकीय यंत्रणेची अनास्था या सर्वांवर मात करत चौक ग्रामीण रुग्णालयात दाखल अनंता पारधी यांच्या पत्नी मनिषा अनंता पारधी यांना शनिवारी सकाळी ठीक ११.१५ वाजता मनिषा यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला.

बाळ आणि माता दोघेही सुखरूप असले, तरी या शासकीय अनास्थेवर मात करून जन्मलेल्या या बालकाच्या निमित्ताने तरी यंत्रणेला जाग येईल का? असा रोकडा सवाल आता उपस्थित केला जात आहे.गेल्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या इरसाळवाडी दरड दुर्घटनेनंतर या भागातील सर्व वाड्यांना रस्ते करुन देण्याचे आश्वासन उरण विधानसभा मतदारसंघाचे सत्ताधारी आमदार महेश बालदी आणि इतर नेत्यांनी दिले होते. मात्र, प्रत्यक्षात रस्त्यासाठी अजून एकही दगड लागलेला नाही.

डोंगर-दऱ्यांतून वेदनादायी प्रवास

खालापूर तालुक्यातील लोधिवली ग्रामपंचायत हद्दीत उंबरणेवाडी, आरकसवाडी, पीरकडवाडी अशा चार आदिवासी आणि ठाकूर बांधवांच्या वाड्या आहेत. या वाड्यांमध्ये ३०० हून अधिक ग्रामस्थ वास्तव्य करतात. नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणापासून अवघ्या ५ ते ६ किमी अंतरावर आणि माथेरानच्या डोंगररांगांच्या कुशीत असलेल्या या वाड्यांना स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही ना रस्ता मिळाला आहे, ना वीज.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT