Pali ST Bus Stand Redevelopment Pudhari
रायगड

Pali ST Bus Stand Redevelopment: पाली बसस्थानकाची परिवहन मंत्र्यांकडून पाहणी; सरनाईकांनी दिली 14 कोटींची संजीवनी

कल्याण-पाली बससेवा सुरू करण्याचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

संदेश उतेकर

सुधागड शहर: राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दि. (30) शनिवार रोजी अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली येथील श्री बल्लाळेश्वराच्या दर्शनाने आपल्या तीन दिवसीय कोकण दौऱ्याची सुरुवात केली. यावेळी त्यांनी बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत कोकणातील रखडलेले विकासप्रश्न मार्गी लागावेत, अशी प्रार्थना केली. श्री बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे त्यांचा सत्कारही करण्यात आला.

दर्शनानंतर प्रताप सरनाईक यांनी पाली-सुधागड एसटी बसस्थानकाची प्रत्यक्ष पाहणी केली. बसस्थानकाच्या दुरवस्थेची गंभीर दखल घेत त्यांनी बसस्थानकाच्या पुनर्विकासासाठी तब्बल 14 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली. तसेच येत्या तीन महिन्यांत या प्रकल्पाचे भूमिपूजन होईल, अशी ग्वाही देत मंत्री प्रताप सरनाईक सुधागड सह रायगडवासीयांना मोठा दिलासा दिला.

पाली बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी आणि अत्याधुनिक सुविधांनी सज्ज नव्या वास्तूच्या उभारणीसाठी शिवसेनेने तसेच विविध सामाजिक संघटना व कार्यकर्ते यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाल्याचे यावेळी दिसून आले.

स्थानिक शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अनेक वर्षांपासून या प्रश्नासाठी आवाज उठवला होता. याबरोबरच ज्येष्ठ पत्रकार रविंद्र नाथ ओव्हाळ यांनी देखील या प्रश्नावर वारंवार आंदोलन व उपोषण केले होते.

पाली बसस्थानकासाठी सुमारे 15 हजार 757 चौरस मीटर जागा सन 1971 मध्ये संपादित करण्यात आली होती. त्यावर 1978 मध्ये उभारण्यात आलेली बसस्थानकाची इमारत कालबाह्य झाल्यानंतर 2022 मध्ये ती पाडण्यात आली. त्यानंतर नव्या अत्याधुनिक बसस्थानकाची मागणी सातत्याने होत होती.

नव्या बसस्थानकात 8 फलाटांचे सुसज्ज बसस्थानक, प्रशस्त प्रतीक्षालय, स्वतंत्र कॅन्टीन, विद्यार्थी व आरक्षणधारकांसाठी विशेष सुविधा, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, चालक-वाहकांसाठी विश्रामगृह, चौकशी केंद्र, प्रशासकीय कार्यालये, दुकाने, उपहारगृह तसेच विविध प्रवासी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. लवकरच निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष बांधकामाला गती दिली जाईल, अशी माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी या पाहणी दौऱ्या दरम्यान दिली.

यावेळी बोलताना सुधागड तालुका प्रमुख अनुपम कुलकर्णी यांनी यावेळी बोलताना शिवसेना सुधागड तालुका प्रमुख अनुपम कुलकर्णी यांनी सांगितले की, शिवसेनेच्या वतीने आमदार महेंद्र दळवी, पक्षाचे वरिष्ठ नेते तसेच स्थानिक पदाधिकारी यांच्या सहकार्याने पाली परिसरातील चार महत्त्वाचे प्रश्न मंत्रालय स्तरावर संबंधित मंत्र्यांकडे सातत्याने मांडण्यात आले होते. यामध्ये पाली बसस्थानकाचे पुनर्विकास काम, ग्रामीण रुग्णालयाची उभारणी, पाली बायपास मार्ग तसेच शुद्ध पाणीपुरवठा योजना या प्रमुख मागण्यांचा समावेश होता.

या प्रश्नांसाठी शिवसेनेने सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे टप्प्याटप्प्याने सर्वच कामांना गती मिळत असून अनेक प्रश्न मार्गी लागण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. पाली बसस्थानकासाठी 14 कोटी रुपयांचा निधी मंजूर होणे हा त्याच प्रयत्नांचा भाग असल्याचे त्यांनी नमूद केले.

पाली आणि सुधागड तालुक्यातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी निगडित असलेले हे चारही प्रश्न शिवसेनेच्या माध्यमातून यशस्वीपणे सोडवले जात असल्याचे पाहून समाधान वाटत असल्याची भावना अनुपम कुलकर्णी यांनी व्यक्त केली. यावेळी राजेंद्र राऊत यांनी ही शिवसेनेने केलेल्या प्रयत्न व पाठपुरावा यामुळे विकासाला प्रचंड गती मिळत असल्याचे म्हटले.

यावेळी शिवसेना रायगड जिल्हा समन्वयक राजेंद्र राऊत, सुधागड तालुका प्रमुख अनुपम कुलकर्णी, जिल्हा परिषद सदस्यां शर्मिला बोडके,शरद बोडके, रिपाइं जिल्हा संपर्क प्रमुख राहूल भाई सोनावळे, रवींद्रनाथ ओव्हाळ, सुधागड तालुका रहिवाशी सेवा संघाचे अध्यक्ष विठ्ठल घाडके व पदाधिकारी तसेच नगरसेवक विनायक जाधव, पाली शहर प्रमुख ओमकार खोडागळे, युवा नेते सचिन डोबले, युवासेना प्रमुख मनोज भोईर, मंगेश पालांडे,सूरज शेळके,सोहम खोडागळे, अखिलेश कुलकर्णी, शरद फोंडे, सुबोध पालांडे, अनिल भोईर, श्री धनावडे, चंद्रकांत चव्हाण यांच्यासह शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सुधागड तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT