

डोंबिवली: 2016 साली प्रदर्शित झालेल्या सैराट चित्रपटाने आंतरजातीय प्रेम आणि ऑनर किलिंगचा विदारक चेहरा समाजासमोर आणला होता. कल्याण पश्चिमेतील पारेकरवाड्यात सोमवारी 25 मे रोजी घडलेल्या गायत्री शिंदे हत्याकांडाने पुन्हा एकदा सैराटची कथा प्रत्यक्षात उतरल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी या हत्याकांडातील विनोद दत्तात्रय वसईकर (50) आरोपीला अटक केली. आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून मुलीची हत्या केल्याची आरोपीने कबुली दिल्याचे पोलिसांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.
कल्याणच्या रचना रॉयल इमारतीत घडलेली घटना याच कथेशी मिळतीजुळती आहे. गायत्री वसईकर हिने नोव्हेंबर 2025 मध्ये भिवंडी येथील अक्षय शिंदे याच्याशी प्रेमविवाह केला होता. अक्षय अन्य जातीचा असल्याने गायत्रीचे वडील विनोद वसईकर (50) यांचा या लग्नाला तीव्र विरोध होता. मुलीमुळे समाजात नाक कापलं गेलं, ही भावना त्यांच्या मनात होती.
रविवारी 24 मे रोजी संपूर्ण कुटुंब एकत्र चित्रपट पहायला गेले, फिरायला गेले. सैराट चित्रपटामध्ये जसे आर्चीचे घरचे गोड बोलून आले होते, तसाच काहीसा प्रकार इथेही दिसला. मात्र सोमवारी 25 मे रोजी दुपारी घरात एकटी असलेल्या गायत्रीचा विनोद वसईकर याने धारदार शस्त्राने खून केला.
एका झटक्यात मुलीला संपवून तो भूमिगत झाला. मजलदरमजल करत अंबरनाथला पोहोचला. गेल्या पाच दिवसांपासून गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत आंधळे आणि त्यांचे पथक त्याला जंग जंग पछाडत होते.
याच दरम्यान खासगी गुप्तहेरांकडून मिळालेल्या माहितीनुसार गायत्रीचा खुनी पिता विनोद वसईकर अंबरनाथ परिसरात मिळेल त्या जागेवर उघड्यावर राहत होता.
ही माहिती मिळाल्यानंतर बाजारपेठ पोलिस ठाण्याचे बाजारपेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेशसिंग गौड, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोनि बाबासाहेब दुकले यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत आंधळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने माग काढत फरार खुनी विनोद वसईकर याला अंबरनाथमधून अटक केली. चौकशीत त्याने मुलीच्या आंतरजातीय विवाहाचा राग मनात होता, म्हणून हत्या केल्याची कबुली दिली आहे.